tarini kedar love confession shocking twist : झी मराठीवरील लोकप्रिय ‘तारिणी’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. सस्पेन्स, अॅक्शन आणि भावनिक नात्यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या मालिकेत आता एक महत्त्वाचा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो अखेर जवळ आला असून तारिणीच्या मनात केदारसाठी प्रेमाची भावना निर्माण झाल्याचं आगामी भागांमध्ये दिसणार आहे.
मालिकेच्या कथानकानुसार, तारिणी आणि केदार यांचं लग्न हे एका मिशनचा भाग म्हणून झालेलं असतं. मात्र, या नात्यामागे केदारच्या मनात खरं प्रेम दडलं असल्याचं अनेक प्रसंगांतून स्पष्ट झालं आहे. तारिणीसमोर मात्र त्याने कधीही आपल्या भावना व्यक्त केलेल्या नसतात. दुसरीकडे, तारिणी तिच्या आयुष्यातील जोडीदार कसा असावा याबद्दल रेवाशी बोलताना दिसते. तिच्या अपेक्षांमधील बहुतांश गुण केदारमध्येच असल्याचं हळूहळू तिलाही जाणवू लागतं.
तारिणीच्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा राहणारा, तिच्या आजीचा आदर करणारा आणि स्त्रीचा सन्मान जपणारा केदार तिच्या मनात खास स्थान निर्माण करतो. याचदरम्यान टीम तारिणी एका मोठ्या मिशनवर काम करत असते. रेव्ह पार्टीच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी टीम सज्ज होते. रेवा युवराजकडून माहिती मिळवण्यात यशस्वी ठरते आणि त्यानंतर टीम त्या पार्टीवर छापा टाकण्याचा निर्णय घेते.
या रेव्ह पार्टीमागचा मुख्य सूत्रधार गुलाब असल्याचं समोर येतं. मानवी अवयव तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला गुलाब रंगेहाथ पकडण्याची मोठी संधी टीमसमोर असते. पण, परिस्थिती अचानक हाताबाहेर जाते आणि तिथे गोळीबार सुरू होतो. या संपूर्ण गोंधळात केदार सतत तारिणीला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तिच्यावर येणारा प्रत्येक धोका स्वतः झेलत असल्याचं पाहून तारिणीच्या मनातील भावना आणखी तीव्र होतात.
मात्र, याच क्षणी गुलाब केदारवर बंदूक रोखतो आणि तारिणी क्षणाचाही विलंब न लावता मध्ये येत गोळी स्वतःच्या अंगावर घेते. हा प्रसंग मालिकेतील सर्वात भावनिक आणि थरारक क्षण ठरणार आहे. जखमी अवस्थेत असलेल्या तारिणीला पाहून केदार पूर्णपणे हादरतो. विशेष म्हणजे, यावेळी तो पहिल्यांदाच तिला ‘बॉस’ऐवजी प्रेमाने ‘तारिणी’ अशी हाक मारताना दिसतो. दुसरीकडे, तारिणीही “आय लव्ह…” म्हणत आपल्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करते, पण त्याच क्षणी तिची शुद्ध हरपते.
हे पण वाचा.. अभिनेत्री पूर्णिमा डेच्या पायाला दुखापत? ‘वीण दोघांतली ही तुटेना’ फेम राज मोरेच्या व्हिडीओने चाहत्यांची वाढली चिंता
tarini kedar love confession shocking twist
या प्रोमोने सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगवली आहे. प्रेक्षकांनी या प्रोमोचं तोंडभरून कौतुक करत मालिकेतील केदार-तारिणीच्या केमिस्ट्रीला विशेष पसंती दिली आहे. अनेकांनी हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट प्रोमो असल्याचं म्हटलं आहे. भावनिक कथानक, अॅक्शन आणि प्रेमाचा सुंदर संगम पाहून चाहते आगामी भागांसाठी अधिक उत्सुक झाले आहेत.
हे पण वाचा.. डिंपलने लालीसमोर उघड केलं गोपाळचं काळं सत्य; तरीही नवऱ्यासाठी ठाम उभी राहिली!
आता तारिणी वाचणार का? गुलाब पोलिसांच्या तावडीत सापडणार की पुन्हा एकदा पळून जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तारिणी-केदारचं नातं आता कोणत्या टप्प्यावर पोहोचणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमध्ये मिळणार आहेत. ‘तारिणी’ ही मालिका दररोज रात्री ९:३० ते १०:१५ या वेळेत झी मराठी वाहिनीवर प्रसारित केली जाते.









