tarini new twist kedar reva harpreet chaddha entry payal jadhav : ‘तारिणी’ ही मालिका सुरुवातीपासूनच वेगळ्या विषयांमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. समाजात घडणाऱ्या विविध गुन्हेगारी घटनांवर आधारित कथानक, त्यात दाखवण्यात येणारी तपास प्रक्रिया आणि अॅक्शनने भरलेले प्रसंग यामुळे मालिकेने अल्पावधीतच स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार, सोशल मीडियावरील फसवणूक, मॉर्फ व्हिडीओ यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करत ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करताना समाजप्रबोधनाचाही प्रयत्न करताना दिसते.
मालिकेतील तारिणी आणि केदार हे स्पेशल क्राईम युनिटमध्ये काम करणारे अधिकारी आहेत. दोघांची मैत्री, एकमेकांवरील विश्वास आणि गुन्हे उकलण्याची त्यांची शैली प्रेक्षकांना विशेष भावते. केदारच्या मनात तारिणीबद्दल प्रेमाची भावना असली तरी तारिणी मात्र त्याला फक्त जवळचा मित्र मानते. एका मिशनसाठी दोघांनी लग्नाचे नाटक केले होते; मात्र परिस्थितीमुळे त्यांना प्रत्यक्षात लग्नबंधनात अडकावे लागले. तरीदेखील तारिणीने केदारला त्याच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यात कायम एक भावनिक गुंतागुंत पाहायला मिळते.
आता या कथेत आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट समोर आला आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये टीममध्ये एका नव्या ऑफिसरची एन्ट्री दाखवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून “ऑफिसर हरप्रीत चड्डा”ची ओळख करून दिली जाते. ती अत्यंत हुशार, धाडसी आणि फिल्डवर उत्तम काम करणारी अधिकारी असल्याचे सांगितले जाते. मात्र सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो, जेव्हा हेल्मेट काढल्यानंतर हरप्रीत चड्डा ही एक मुलगी असल्याचे समोर येते.
या नव्या ऑफिसरला पाहताच केदारच्या चेहऱ्यावर अचानक आनंद झळकतो. तो तिला “रेवा” म्हणून हाक मारतो. त्यावर तीही त्याला “केडी” म्हणत ओळख दाखवते. अनेक वर्षांनी भेट झाल्यासारखे दोघे एकमेकांना मिठी मारतात. हा प्रसंग पाहून संपूर्ण टीमच आश्चर्यचकित होते. विशेष म्हणजे तारिणीच्या चेहऱ्यावरही या भेटीबद्दल उत्सुकता आणि आनंद दिसून येतो. त्यामुळे रेवा आणि केदार यांचे नेमके नाते काय? त्यांच्या भूतकाळात काय घडले होते? आणि या नव्या एन्ट्रीमुळे तारिणी-केदारच्या नात्यावर काय परिणाम होणार? याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
ऑफिसर हरप्रीत चड्डा उर्फ रेवाची भूमिका अभिनेत्री पायल जाधव साकारत आहे. यापूर्वी ती एका लोकप्रिय मालिकेत मुख्य भूमिकेत झळकली होती आणि तिच्या अभिनयाचे भरभरून कौतुक झाले होते. आता तिच्या एन्ट्रीमुळे ‘तारिणी’ मालिकेतील कथानक अधिक रंजक होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
हे पण वाचा.. अभिनेत्री धनश्री काडगावकरची स्टार प्रवाहवरील मालिकेत एन्ट्री
tarini new twist kedar reva harpreet chaddha entry payal jadhav
झी मराठीने शेअर केलेल्या या प्रोमोवर प्रेक्षकांनीही उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी “आता खरी मजा येणार”, “केदारच्या आयुष्यातील रेवा कोण?” अशा कमेंट्स करत आगामी भागांबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. त्यामुळे येत्या भागांमध्ये मालिकेत भावनिक, अॅक्शन आणि नात्यांच्या संघर्षांनी भरलेले अनेक नवे वळण पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा.. विशाल निकम अक्षया हिंडाळकर यांनी घेतलं आई तुळजाभवानीचं दर्शन









