lagnanantar hoilach prem serial new entry kshama deshpande divya role : मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका “लग्नानंतर होईलच प्रेम” सध्या प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या सुरू असलेलं कथानक अधिकच रंगतदार होत असतानाच आता एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. कथानकात नवीन वळण आणण्यासाठी निर्मात्यांनी आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री केली आहे, ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
सध्या मालिकेत काव्या आणि नंदिनी या दोघींच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पाहायला मिळत आहेत. दोघीही गरोदर असल्याने देशमुख कुटुंबात उत्साहाचं वातावरण आहे. मात्र, हा आनंद वसु आत्याला अजिबात सहन होत नसल्याचं दिसून येत आहे. तिच्यासोबत रम्या देखील काव्याच्या आयुष्यात अडथळे निर्माण करण्यासाठी सतत काही ना काही डाव आखताना दिसते.
अशातच आता मालिकेत “दिव्या देशपांडे” या नव्या पात्राची एन्ट्री झाली आहे. ही भूमिका अभिनेत्री क्षमा देशपांडे साकारणार आहे. कथानकानुसार, दिव्या ही पार्थच्या ऑफिसमध्ये काम करणारी एक सिनिअर आर्किटेक्ट असणार आहे. विशेष म्हणजे, रम्याच्या जागी ही जबाबदारी आता दिव्या सांभाळणार असल्याचं दाखवलं जाणार आहे. त्यामुळे तिची एन्ट्री केवळ साधी नसून कथानकाला नवं वळण देणारी ठरणार आहे.
दिव्या या पात्रामुळे पार्थ आणि काव्याच्या नात्यात काही बदल होणार का, किंवा ती त्यांच्या संसारात नवीन समस्या निर्माण करणार का, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच, वसु आत्याचा काही गुप्त प्लॅन तर नाही ना, असा प्रश्नही अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे.
दरम्यान, क्षमा देशपांडे ही याआधीही मराठी मालिकांमध्ये झळकली आहे. “उदे गं अंबे” आणि “इंद्रायणी” यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. आता ती नव्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हे पण वाचा.. नम्रता संभेरावची प्रसाद खांडेकरसाठी खास वाढदिवस पोस्ट
lagnanantar hoilach prem serial new entry kshama deshpande divya role
क्षमा देशपांडेनं स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिच्या नव्या प्रवासाची माहिती दिली आहे. “मी दिव्या देशपांडे… आजपासून एका नव्या भूमिकेत तुमच्यासमोर येतेय,” असं म्हणत तिनं चाहत्यांना मालिकेचा भाग होण्याचं आवाहन केलं आहे.
हे पण वाचा.. थायलंडच्या “पट्टाया” बीचवर अभिनेत्री “गौरी नलावडे”ची धमाल; कॅज्युअल लूकने वेधलं लक्ष
“लग्नानंतर होईलच प्रेम” ही मालिका “स्टार प्रवाह” वाहिनीवर दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसारित केली जाते. आगामी भागांमध्ये दिव्याची भूमिका नेमकी कोणती दिशा घेते आणि तिच्या येण्यामुळे काव्या-पार्थच्या आयुष्यात काय बदल होतात, हे पाहणं रंजक ठरणार आहे.









