Abhijeet Sawant Enjoys Peaceful Konkan Vacation With Family In Devgad Village : मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक अभिजीत सावंत सध्या आपल्या कुटुंबासह कोकणातील गावी निवांत वेळ घालवत आहे. मुंबईच्या गजबजाटापासून काही दिवस दूर जात त्याने निसर्गाच्या सान्निध्यात खास क्षण अनुभवले आहेत. या कोकण ट्रिपचा सुंदर व्हिडीओ अभिजीतने सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामधील गावाकडच्या आठवणी आणि साधेपणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
एप्रिल आणि मे महिन्यात कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सुट्ट्यांचा काळ असल्याने अनेक जण आपल्या मूळ गावी परततात. मराठी मनोरंजन क्षेत्रातील कलाकारही शूटिंगच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून गावची वाट धरताना दिसतात. अभिजीत सावंतनेही यंदा आपल्या कुटुंबासह कोकणातील देवगड तालुक्यातील गावी खास वेळ घालवण्याचा निर्णय घेतला.
त्याने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये गावाकडचं शांत आयुष्य, हिरवागार परिसर आणि समुद्रकिनाऱ्याचं सौंदर्य पाहायला मिळत आहे. घराच्या अंगणात बसून चहा पिणं, गावातील रस्त्यांवर फेरफटका मारणं, एसटीच्या लालपरीतून प्रवास करणं आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं अशा अनेक साध्या पण मनाला भावणाऱ्या क्षणांची झलक या व्हिडीओमध्ये दिसते.
विशेष म्हणजे अभिजीत आपल्या लेकीलाही गावातील पारंपरिक वातावरण अनुभवायला घेऊन गेला होता. काजूच्या बागेत फिरणं, नदीकिनारी वेळ घालवणं आणि समुद्रकिनाऱ्यावर निवांत फिरताना त्यांचे सुंदर क्षण चाहत्यांना पाहायला मिळाले. “सुख म्हणजे गावाकडचा प्रवास…” असं भावनिक कॅप्शन देत अभिजीतने ही कोकण ट्रिप अधिक खास बनवली आहे.
अभिजीत सावंतचं मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गोवळ येथे आहे. निसर्गरम्य वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात आंबा, नारळ आणि काजूच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या गावात शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळतं. त्यामुळेच कोकणात गेले की कलाकारांसह पर्यटकही या वातावरणात पूर्णपणे रमून जातात.
हे पण वाचा.. कान्स २०२६ मध्ये मराठमोळ्या संस्कृतीची झलक! अशोक सराफांच्या नमस्काराने जिंकली चाहत्यांची मनं
Abhijeet Sawant Enjoys Peaceful Konkan Vacation With Family In Devgad Village
दरम्यान, अभिजीत सावंतने ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वाचं विजेतेपद पटकावत संपूर्ण देशभर लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर आलेल्या ‘आपका अभिजीत सावंत’ या अल्बममधील ‘मोहब्बतें लुटाऊंगा’ हे गाणं प्रचंड गाजलं. आजही या गाण्याची लोकप्रियता कायम असल्याचं पाहायला मिळतं
हे पण वाचा.. हृता दुर्गुळेच्या सासूबाईंची ‘आनंदी’ मालिकेत एन्ट्री; साकारणार खलनायिकेची भूमिका!
गायनासोबतच अभिजीतने विविध रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात तो उपविजेता ठरला होता. त्यानंतर ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधूनही त्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. सध्या तो नवीन म्युझिक प्रोजेक्ट्समधून चाहत्यांच्या भेटीला येत असून, सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळत आहे.









