veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदी यांच्या नात्यात आता मोठं वळण येताना दिसत असून, नव्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढवली आहे. अनेक दिवस मनात दडवून ठेवलेल्या भावना अखेर स्वानंदीच्या ओठांवर आल्याचं या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
मालिकेत नुकतीच अभिनेत्री पूर्वा गोखलेची एन्ट्री झाली आहे. तिने साकारलेली ‘किमया’ ही व्यक्तिरेखा कथेला वेगळं वळण देताना दिसतेय. किमया आणि समर यांच्यातील मैत्री दिवसेंदिवस अधिक घट्ट होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. मात्र, हीच जवळीक स्वानंदीला अस्वस्थ करू लागली आहे. समर दुसऱ्या कोणासोबत वेळ घालवताना पाहून तिच्या मनात निर्माण होणारी असुरक्षितता आणि जळफळाट आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे.
समर आणि स्वानंदीमध्ये आधीपासूनच हलकीफुलकी भांडणं आणि गोड क्षण पाहायला मिळत होते. पण आता त्या नात्यात प्रेमाची जाणीव अधिक गहिरी होत असल्याचं कथानकातून स्पष्ट होत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये स्वानंदी दारूच्या नशेत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. समर तिची काळजी घेत तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो. तो तिला पाणी देतो, मात्र स्वानंदी त्याला हटके उत्तर देताना दिसते.
“मला पाणी नको… मला तुम्ही हवे आहात… एक ग्लास समर राजवाडे,” असं ती नशेत बोलताना दिसते. तिच्या या संवादामुळे समरही काही क्षणांसाठी गोंधळून जातो. या प्रसंगातून स्वानंदीच्या मनातलं प्रेम नकळत बाहेर पडतं आणि त्यानंतर कथेत काय घडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.
झी मराठीने हा प्रोमो शेअर करताना “अखेर समरबद्दलचं प्रेम स्वानंदीच्या ओठांवर येणार!” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता समरला तिच्या भावना समजतील का? तोही आपल्या मनातील प्रेम व्यक्त करेल का? असे अनेक प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
veen doghantali hi tutena swanandi samar prem kabuli promo
दरम्यान, किमयाच्या आगमनामुळे मालिकेतील समीकरणं बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मल्लिका या परिस्थितीचा फायदा घेत समर आणि स्वानंदीमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करणार का, याकडेही प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. सिद्धार्थ जाधवची मलेशिया सफर; कुटुंबासोबत जेंटिंग स्कायवर्ल्ड्समध्ये धमाल
सोशल मीडियावर या प्रोमोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. “हा भाग पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत”, “समरने आता तरी स्वानंदीच्या भावना समजून घ्याव्यात”, “दोघांची जोडी खूप गोड दिसते”, अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. मालिकेतील हा रोमँटिक ट्विस्ट आता पुढील भागांमध्ये कोणतं नवं वादळ घेऊन येणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.









