tharala tar mag sayali madhubhau vatsalya ashram priya karasthan : मराठीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे. कथानकात सलग घडणाऱ्या मोठ्या घटनांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य सर्वांसमोर आल्यानंतर तिच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसत आहेत. कुटुंबाकडून मिळालेलं प्रेम, स्वीकार आणि नव्याने जुळलेली नाती यामुळे सायलीचा आनंद द्विगुणित झाला आहे.
खऱ्या तन्वीची ओळख पटल्यावर रविराज किल्लेदार यांनी आपल्या संपत्तीबाबत महत्त्वाचा निर्णय घेतल्याने कथानकाला नवं वळण मिळालं आहे. या निर्णयामुळे काही पात्रांमध्ये नाराजी निर्माण झाली असली, तरी सायलीसाठी हा क्षण अत्यंत भावनिक ठरतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर तिला तिची खरी ओळख आणि कुटुंब मिळाल्याने तिच्या आयुष्यात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
याच आनंदात आणखी भर घालणारी घटना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. सायलीचं वात्सल्य आश्रमाशी असलेलं नातं सुरुवातीपासूनच अतूट राहिलं आहे. आश्रमातील मुलांप्रती तिची असलेली आपुलकी आणि मधुभाऊंसाठी केलेला संघर्ष पाहून मधुभाऊ एक मोठा निर्णय घेतात. ते आश्रमातील सर्व मुलांना एकत्र बोलावतात आणि सायलीवर वात्सल्य आश्रमाची संपूर्ण जबाबदारी सोपवतात. हा विश्वास पाहून सायली भावूक होते आणि आश्रमातील प्रत्येक मुलाला प्रेम, आधार आणि न्याय मिळेल, याची ग्वाही देते. मधुभाऊंनी जपलेल्या या संस्थेची परंपरा कायम ठेवण्याचं आश्वासनही ती देते.
मात्र सायलीच्या आयुष्यात आनंदाचे क्षण सुरू असतानाच दुसरीकडे संकटाची चाहूल लागते. जेलमध्ये असलेली प्रिया अजूनही शांत बसलेली नसून ती सायलीविरोधात नव्या कारस्थानाची तयारी करताना दिसते. सायलीला सर्वाधिक प्रिय असलेल्या वात्सल्य आश्रमाचाच वापर तिच्याविरोधात करण्याचा इशारा ती देते. त्यामुळे आगामी भागात नेमकं कोणतं संकट उभं राहणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
मालिकेचा प्रोमो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी प्रियाचं पात्र पुन्हा त्याच प्रकारचं कारस्थान करत असल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. तर काहींनी कथानकात सतत एकाच प्रकारचे ट्विस्ट दाखवले जात असल्याची टीका केली आहे. अनेकांनी मालिकेत आता काहीतरी वेगळं आणि ताजं पाहायला मिळावं, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना मध्ये धक्कादायक ट्विस्ट! आजीचं अपहरण, समरसमोर २५ लाखांची खंडणी; स्वानंदीवरही ओढवलं मोठं संकट
दरम्यान, ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आगामी भागात सायलीवर आलेली नवी जबाबदारी, प्रियाचा धोकादायक डाव आणि वात्सल्य आश्रमाभोवती घडणाऱ्या घटना कथेला वेगळं वळण देणार आहेत. सायली या नव्या संकटावर मात करणार की प्रियाच्या योजनेत अडकणार, याचं उत्तर पुढील भागांमध्ये मिळणार असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हे पण वाचा.. ऐश्वर्या नारकरांच्या ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ मालिकेच्या प्रसारणात मोठा बदल; नवी तारीख आणि वेळ जाहीर









