Savalyachi Janu Savali Promo : सावळ्याची जणू सावली’ मालिकेची कथा सध्या भावनिक वळणावर पोहोचली आहे. अनेक वर्षांच्या दुराव्यानंतर सारंग आणि सावली पुन्हा एकमेकांच्या आयुष्यात आले आहेत. दोघे एकाच घरात राहत असले, तरी त्यांच्या नात्यातील जुन्या गैरसमजांची सावली अजूनही कायम आहे. मात्र, अबीर आणि ओवी यांच्यात तयार झालेलं नातं त्यांच्या आयुष्यातील अनेक जुन्या गोष्टींचा उलगडा करण्यासाठी महत्त्वाचं ठरताना दिसत आहे. त्यामुळे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेच्या आगामी भागांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
सारंग आणि सावलीच्या आयुष्यातील दुराव्यामागे राजकुमारचा मोठा हात होता. सारंगचा भाऊ असलेल्या राजकुमारने दोघांमध्ये गैरसमज निर्माण करून त्यांना एकमेकांपासून दूर केलं. त्यानंतर सावली आणि तिच्या जुळ्या मुलांनाही त्याने लक्ष्य केलं. या कटामुळे सावलीच्या आयुष्यातील एक मुलगी तिच्यापासून कायमची दुरावली. त्या काळातील घटना सावलीच्या मनावर खोलवर कोरल्या गेल्या आहेत.
दुसरीकडे, परिस्थितीने त्या मुलीला सारंगपर्यंत आणलं. तिची खरी ओळख माहीत नसतानाही सारंगने तिचा स्वीकार केला आणि स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेतली. त्यामुळे ओवी ही सावलीचीच मुलगी असल्याचं सत्य अजूनही तिच्यापासून लपलेलं आहे. आता इतक्या वर्षांनंतर सारंग आणि सावली पुन्हा जवळ येत असताना हे गुपित उघड होण्याच्या दिशेने कथा पुढे जात असल्याचे संकेत मिळत आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये रक्षाबंधनाचा सुंदर प्रसंग दाखवण्यात आला आहे. ओवी मोठ्या उत्साहाने अबीरला ओवाळते आणि त्याच्या हातावर राखी बांधते. या वेळी सावली, सारंग, मोनिका आणि अमृता देखील तिथे उपस्थित असतात. भावंडांच्या या आनंदाच्या क्षणाकडे घरातील सगळेजण कौतुकाने पाहत असतात.
मात्र, ओवीचं एक वाक्य सावलीच्या मनात दडलेल्या जुन्या आठवणी जाग्या करतं. सावली तिला रक्षाबंधनाचा विधी पूर्ण झाल्याचं सांगते. त्यावर ओवीला अबीरला आणखी राख्या बांधायच्या असल्याचं ती सांगते. त्यानंतर ती ‘आठ वर्षांच्या आठ राख्या’ असा उल्लेख करते. हे ऐकताच सावली काही क्षणांसाठी भूतकाळात हरवते. तिच्यापासून दुरावलेल्या मुलीची आठवण तिला येते. तिचं बाळ नेल्यानंतर त्या घटनेबाबत तिला जे सांगण्यात आलं होतं, त्याची आठवण होताच सावली भावुक होते.
हे पण वाचा.. ठरलं तर मग’मध्ये अर्जुनवर जीवघेणा हल्ला; ‘बायको…’ म्हणत मिटले डोळे, सायलीला मिळाला धक्कादायक संकेत
या प्रसंगामुळे ओवी आणि अबीरच्या नात्याभोवतीचं गूढ आणखी वाढलं आहे. दोघांमधील नातं इतकं घट्ट का आहे आणि त्यामागे सावलीच्या भूतकाळाशी जोडलेलं कोणतं सत्य दडलं आहे, हा प्रश्न आता महत्त्वाचा ठरतो. जर ओवी आणि अबीर हे सख्खे भाऊ-बहीण असल्याचं सत्य समोर आलं, तर सारंग आणि सावलीच्या आयुष्यालाही मोठं वळण मिळू शकतं.
विशेष म्हणजे, प्रोमो शेअर करताना झी मराठीने ‘अबीर-ओवी जोडणार दुरावलेली नाती’ असा संकेत दिला आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्यामुळे सावलीला तिच्या मुलीची खरी ओळख पटणार का, सारंगला देखील सत्य कधी समजणार आणि त्यानंतर सारंग-सावली पुन्हा एकत्र येणार का, याची उत्सुकता आहे.
Savalyachi Janu Savali Promo
त्यामुळे ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील पुढील भाग प्रेक्षकांसाठी भावनिक आणि महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. अबीर-ओवीच्या नात्यातून आठ वर्षांपूर्वीचं गुपित उलगडणार का आणि या सत्यामुळे सावलीच्या आयुष्यात पुन्हा हरवलेलं कुटुंब परतणार का, याचं उत्तर आगामी भागांमध्ये मिळणार आहे.









