tarini kedar hatke proposal premachi kabuli : ‘तारिणी’ मालिकेच्या प्रेक्षकांसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या प्रसंगाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, तो क्षण अखेर आता मालिकेत पाहायला मिळणार आहे. केदार आणि तारिणीच्या नात्याला नवं वळण देणारा रोमँटिक ट्रॅक सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असून, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
मालिकेच्या सुरुवातीपासूनच केदारच्या मनात तारिणीबद्दल खास भावना असल्या तरी त्याने त्या कधीही उघडपणे व्यक्त केल्या नव्हत्या. परिस्थितीमुळे दोघांचं लग्न झालं असलं तरी ते एका ठराविक उद्देशासाठी झालेलं नातं असल्याचं तारिणीने स्पष्ट केलं होतं. मिशन पूर्ण झाल्यानंतर दोघांनी वेगळं व्हायचं, असा निर्णयही पूर्वी घेण्यात आला होता.
मात्र, कालांतराने केदारचा स्वभाव, त्याची माणुसकी आणि तिच्याबद्दलची काळजी पाहून तारिणीच्या मनात त्याच्याविषयी प्रेमाची भावना निर्माण होते. आपल्या मनातील भावना ती सर्वप्रथम रेवासमोर व्यक्त करते. त्यानंतर एका धोकादायक मिशनदरम्यान तारिणीला गोळी लागते आणि त्या गंभीर क्षणी ती केदारवर प्रेम असल्याचं कबूल करते. मात्र, त्या प्रसंगानंतर तिला अपेक्षित उत्तर मिळत नाही. त्यामुळे तिच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात.
रुग्णालयातून घरी परतल्यानंतरही केदारच्या शांततेमुळे तारिणी अस्वस्थ होते. अखेर ती थेट त्यालाच याबाबत विचारणा करते. मात्र, केदार तिच्यापासून सत्य लपवत असल्याचं दिसून येतं. तो आपल्या आयुष्यात दुसरी कोणीतरी मुलगी असल्याचं सांगतो. हे ऐकल्यानंतर तारिणीला मोठा धक्का बसतो आणि तिच्या मनात दुःख दाटून येतं.
प्रत्यक्षात केदारने तारिणीसाठी एक खास सरप्राईज आखलेलं असतं. तो तिला त्या पोलीस ट्रेनिंग ग्राऊंडवर घेऊन जातो, जिथून त्यांच्या मैत्री आणि सहवासाची सुरुवात झाली होती. हातात बंदूक देत तो तिला पुन्हा एकदा लक्ष्य साधण्यास सांगतो. तारिणी अचूक नेम साधताच आकाशात रंगीबेरंगी आतिषबाजी सुरू होते. त्याच वेळी केदार तिच्या कानात हळूच सांगतो की, जिच्याबद्दल तुला जाणून घ्यायचं होतं, ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तूच आहेस.
हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये नवा ट्विस्ट; सुश्मिताने मागितले राजवाडे घरातील अधिकार, समर-स्वानंदी झाले अवाक्
tarini kedar hatke proposal premachi kabuli
आकाशात झळकणाऱ्या प्रकाशात स्वतःची प्रतिमा पाहून तारिणी भावूक होते. केदारच्या या आगळ्यावेगळ्या प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीने तिचे डोळे पाणावतात. अनेक महिन्यांपासून या क्षणाची वाट पाहणाऱ्या प्रेक्षकांनीही सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मालिकेतील कौशिकीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीनेही प्रोमोवर प्रेम व्यक्त करणारी प्रतिक्रिया दिली आहे. तर चाहत्यांनी “यालाच म्हणतात खास प्रपोजल”, “खूप दिवसांनी मन जिंकणारा सीन पाहायला मिळणार” आणि “केदार-तारिणीची जोडी सर्वोत्तम” अशा प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
हे पण वाचा.. मी तुला प्रपोज केलं होतं, उत्तर काय?तारिणीच्या प्रश्नावर केदारने दिलं उत्तर
दरम्यान, केदार आणि तारिणीच्या नात्यातील हा महत्त्वाचा टप्पा प्रेक्षकांना २९ आणि ३० जून रोजी रात्री ९.३० वाजता पाहायला मिळणार असून, या विशेष भागाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.









