sai kalyankar pregnancy experience : ‘कमळी’ या लोकप्रिय मराठी मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सई कल्याणकर सध्या तिच्या आयुष्यातील नव्या टप्प्याचा आनंद घेत आहे. काही महिन्यांपूर्वीच सईने एका गोंडस मुलीला जन्म दिला असून आता तिने तिच्या गरोदरपणाचा आणि आई झाल्यानंतरच्या भावनिक अनुभवांचा खुलासा केला आहे. अभिनय क्षेत्रात सक्रिय असतानाच तिने मातृत्वाची जबाबदारी स्वीकारली आणि त्याच काळात आलेल्या शारीरिक व मानसिक बदलांबद्दल ती प्रथमच इतक्या मोकळेपणाने बोलली.
सईने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, गरोदरपणाचा काळ तिच्यासाठी खूप वेगळा आणि शिकवणारा ठरला. त्या दिवसांमध्ये ती नियमित काम करत होती. मात्र मुलगी झाल्यानंतर लगेच पुन्हा काम सुरू करावं लागेल, असा तिचा अजिबात विचार नव्हता. पण परिस्थिती, कामाचं वातावरण आणि निर्मिती संस्थेची साथ यामुळे तिने पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. विशेष म्हणजे मुलगी अवघी दोन महिन्यांची असतानाच ती पुन्हा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली.
आई झाल्यानंतर आयुष्य पूर्णपणे बदलतं, याची जाणीव आता प्रत्यक्ष अनुभवातून होत असल्याचं सईने सांगितलं. “आईचं मन काय असतं हे आई झाल्यावरच समजतं,” असं म्हणत तिने मातृत्वातील भावनिक बाजू उलगडली. सुरुवातीचे काही दिवस तिच्यासाठी खूप कठीण होते. मुलीची तब्येत ठीक नसल्यामुळे ती सतत चिंतेत असायची. स्वतःपेक्षा बाळाची काळजी जास्त वाटत होती. त्या काळात ती अनेकदा भावूक झाली आणि खूप रडल्याचंही तिने कबूल केलं.
हे पण वाचा.. स्टार प्रवाहवर नवी मालिका ‘सुना येती घरा’! अशोक शिंदे, दीपा परब आणि शर्मिष्ठा राऊत प्रमुख भूमिकेत
प्रसूतीच्या अनुभवाबद्दल बोलताना सईने सांगितलं की, तिने तब्बल १४ तास प्रसूती वेदना सहन केल्या. नैसर्गिक प्रसूतीची अपेक्षा असतानाच अखेरीस डॉक्टरांनी सीझेरियन करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणी मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा मोठा ताण होता. अभिनेत्री कुंजिका हिच्याशी ती सतत संपर्कात होती, कारण दोघींचे अनुभव जवळपास सारखेच होते. कुंजिकालाही अनेक तास वेदना सहन केल्यानंतर सी-सेक्शन करावं लागलं होतं.
गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये वाढलेलं वजन, शरीरात होणारे बदल आणि भविष्याची चिंता यामुळे ती कधी कधी अस्वस्थ व्हायची. मात्र मातृत्वाचा खरा प्रवास बाळाच्या जन्मानंतर सुरू होतो, हे तिला आता उमगलं आहे. सध्या सई तिच्या आईकडे राहत असून कुटुंबाची चांगली साथ मिळत असल्यामुळे ती काम आणि मातृत्व दोन्ही गोष्टी आनंदाने सांभाळत आहे.
हे पण वाचा.. २०११ ते २०२६…! विशाखा सुभेदारची पंढरीनाथ कांबळेसाठी खास पोस्ट; “तुझ्यासारखा प्रवास सवंगडी नाहीच…”
sai kalyankar pregnancy experience
अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातील हा नवा प्रवास सईसाठी खूप खास ठरत असून तिच्या अनुभवांशी अनेक नवमातांना सहज रिलेट करता येईल, अशीच चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगली आहे.









