namrata sambherao anniversary special post for husband : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करणारी अभिनेत्री नम्रता संभेराव सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनयाच्या माध्यमातून सतत प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या नम्रताने यावेळी तिच्या वैयक्तिक आयुष्यातील भावनिक क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तिने सोशल मीडियावर पती योगेश संभेरावसाठी एक प्रेमळ पोस्ट लिहिली असून तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
नम्रताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या वैवाहिक आयुष्यातील अनेक सुंदर क्षण पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे तिने २०१३ सालातील पहिला सेल्फीही चाहत्यांसमोर शेअर केला आहे. त्या जुन्या फोटोने अनेकांचे लक्ष वेधून घेतले असून चाहत्यांनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या पोस्टमध्ये नम्रताने पतीसाठी आपल्या भावना व्यक्त करत अतिशय साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत. “१३ मे, १३ वर्ष आणि तेरा साथ” असे म्हणत तिने त्यांच्या नात्याचा प्रवास आठवला. एवढ्या वर्षांनंतरही आपले प्रेम, मैत्री आणि चेहऱ्यावरील हास्य कायम तसंच राहावं, अशी प्रार्थनाही तिने व्यक्त केली आहे. तसेच मुलगा रुद्राजबद्दल बोलताना तिने पतीबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली आहे. “माझ्या आयुष्यात इतकं गोड बाळ आणल्याबद्दल मी कायम ऋणी राहीन,” अशा भावना नम्रताने पोस्टमधून मांडल्या.
नम्रताच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा अक्षरशः वर्षाव झाला आहे. चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काहींनी त्यांच्या नात्यातील गोडवा कायम असाच राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली, तर अनेकांनी नम्रताच्या जुन्या आणि आताच्या फोटोतील तिच्या लूकचंही कौतुक केलं. “१३ वर्षांपूर्वी जशी दिसायचीस, तशीच आजही दिसतेस,” अशा कमेंट्सनी पोस्ट गाजत आहे.
हे पण वाचा.. उन्हाच्या झळांमध्येही गौरी कुलकर्णीचा ग्लॅमरस अंदाज; ‘ब्लॅक अँड ब्युटीफुल’ फोटोशूटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा
namrata sambherao anniversary special post for husband
दरम्यान, नम्रता संभेरावने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून मोठी लोकप्रियता मिळवली. तिची विनोदी शैली, भन्नाट टायमिंग आणि विविध भूमिका साकारण्याची हातोटी यामुळे ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली आहे. छोट्या पडद्याबरोबरच ती नाटक आणि चित्रपटांमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. सोशल मीडियावरही ती कायम सक्रिय असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते. त्यामुळे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अशा खास पोस्ट चाहत्यांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरतात.
हे पण वाचा.. सिद्धार्थ जाधवचा फॅमिली व्हेकेशन मोड ऑन! मलेशियातील पत्नी-लेकींसोबतचे फोटो व्हायरल









