tarini serial gulab mastermind navin twist : झी मराठीवरील ‘तारिणी’ ही मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली असून प्रत्येक भागासोबत रहस्य अधिकच गडद होत आहे. अलीकडेच प्रसारित झालेल्या प्रोमोमुळे कथानकात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणासाठी युवराज आणि गुलाब यांच्यावर संशय घेतला जात होता. मात्र आता या दोघांपेक्षाही मोठा सूत्रधार पडद्यामागे असल्याचे संकेत मिळाल्याने प्रेक्षकांमध्ये नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.
कथेनुसार, तारिणी आणि तिच्या टीमने नियोजनबद्ध कारवाई करत रेव्ह पार्टीवर छापा टाकून गुलाबला ताब्यात घेतले. त्यानंतर गुलाबकडून सत्य बाहेर काढण्यासाठी तारिणी सातत्याने प्रयत्न करत असते. विशेषतः तिच्या आईच्या मृत्यूशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ती विविध मार्गांचा अवलंब करते. सुरुवातीला गुलाब कोणतीही माहिती देण्यास नकार देतो आणि प्रत्येक प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करतो.
अखेर तारिणी वेगळी युक्ती वापरते. परदेशात राहणाऱ्या गुलाबच्या मुलीबाबतची संपूर्ण माहिती तिच्याकडे असल्याचे ती त्याला दाखवून देते. मुलीच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागल्याने गुलाबची भूमिका बदलते आणि तो काही महत्त्वाचे खुलासे करण्यास तयार होतो. त्याचवेळी पुढील २४ तासांत संपूर्ण तपास केंद्रीय यंत्रणेकडे जाणार असल्याने गुलाबची कस्टडीही हस्तांतरित होणार असल्याचे स्पष्ट होते.
मात्र जाण्यापूर्वी गुलाब तारिणीसमोर एक धक्कादायक सत्य मांडतो. तो सांगतो की, तारिणीच्या आईच्या मृत्यूच्या घटनेचा तो प्रत्यक्ष साक्षीदार होता, पण तिच्या हत्येमागे स्वतःचा हात नसल्याचा दावा करतो. एवढेच नाही तर खरा गुन्हेगार दूर नसून तारिणीच्या आसपासच वावरत असल्याची महत्त्वाची हिंटही तो देतो. मात्र त्या व्यक्तीचे नाव सांगण्यापूर्वीच तो शांत राहतो. त्यामुळे तारिणीचा संताप अनावर होतो आणि पुढे काय घडणार, याची उत्सुकता अधिक वाढते.
या प्रोमोने सोशल मीडियावरही मोठी चर्चा रंगवली आहे. अनेक प्रेक्षकांनी कमेंट्स करत संभाव्य मास्टरमाईंड कोण असू शकतो, याबाबत वेगवेगळे अंदाज व्यक्त केले आहेत. काहींनी कौशिकीवर संशय व्यक्त केला आहे, तर काहींनी दयानंद खांडेकरचे नाव पुढे केले आहे. मात्र सर्वाधिक चर्चा डॉ. कामत यांच्या नावाची होताना दिसत आहे. त्यांच्या काही हालचाली आणि तपासादरम्यानचे वर्तन पाहता, संपूर्ण कटामागे तेच असू शकतात, असा अंदाज अनेक चाहत्यांनी व्यक्त केला आहे.
हे पण वाचा.. वाढदिवशी जुई गडकरी चाहत्यांना देणार दुहेरी भेट; ‘ठरलं तर मग’मध्ये मोठा ट्विस्ट, यूट्यूबवरही खास सरप्राइज
आता गुलाबने दिलेली हिंट तारिणीला खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचवेल का, आणि पडद्यामागचा मास्टरमाईंड नेमका कोण आहे, याचे उत्तर आगामी भागांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे ‘तारिणी’ मालिकेचा पुढील भाग प्रेक्षकांसाठी विशेष ठरणार असून रहस्याचा हा गुंता कसा उलगडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









