mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother : मराठी’वरील लोकप्रिय ठरत असलेल्या ‘तुला जपणार आहे’ या मालिकेमुळे अभिनेत्री महिमा म्हात्रे घराघरांत पोहोचली आहे. मालिकेत ‘मीरा’ ही भूमिका साकारत असलेल्या महिमाने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. अभिनय, मेहनत आणि सातत्य यांच्या जोरावर तिने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख तयार केली असली, तरी या प्रवासामागे तिच्या आईचं मोठं योगदान असल्याचं महिमाने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.
मातृदिनाच्या निमित्ताने बोलताना महिमाने तिच्या आयुष्यातील अनेक खास गोष्टी शेअर केल्या. अभिनय क्षेत्रात काम करताना अनेक चढ-उतारांना सामोरं जावं लागतं. मात्र प्रत्येक कठीण प्रसंगात आईने दिलेलं मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यामुळेच ती मजबूत राहिली, असं महिमाचं म्हणणं आहे.
मालिकेच्या शूटिंगदरम्यान घोडेस्वारीचा एक सीन करताना तिचा अपघात झाला होता. या अपघातामुळे काही दिवस विश्रांती घ्यावी लागणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण महिमाने केवळ १५ दिवसांत पुन्हा शूटिंगला सुरुवात केली. या निर्णयामागचं धैर्य आईकडून मिळालेल्या शिकवणीमुळेच आलं, असं तिने स्पष्ट सांगितलं. संकट कोणतंही असो, हार मानायची नाही आणि परिस्थितीशी लढत पुढे जायचं, हा गुण तिने आईकडूनच शिकल्याचं महिमा म्हणाली.
महिमाची आई सुरुवातीला शिक्षिका म्हणून काम करत होती. मात्र कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्यासाठी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही तिने स्वतःला थांबू दिलं नाही. घर सांभाळतानाच ती वडिलांच्या व्यवसायातही सक्रिय झाली आणि प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडली. आईचा हाच संघर्ष आणि जिद्द स्वतःसाठी प्रेरणादायी असल्याचं महिमाने सांगितलं.
नुकताच महिमाचा साखरपुडाही पार पडला आहे. त्यामुळे तिच्या लग्नाच्या चर्चांनाही आता वेग आला आहे. लग्नानंतर कोणती गोष्ट सर्वात जास्त मिस करशील? असा प्रश्न विचारण्यात आला असता महिमाने भावूक उत्तर दिलं. घरातील माणसं आणि विशेषतः आईच्या हातचं जेवण खूप आठवेल, असं ती म्हणाली. मात्र आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आईने दिलेल्या शिकवणी आणि छोट्या-छोट्या गोष्टी कायम सोबत असतील, असा विश्वासही तिने व्यक्त केला.
हे पण वाचा.. पडद्यावर हसतमुख, पण खऱ्या आयुष्यात तणावाशी झुंजत होती मृणाल दुसानिस; अभिनेत्री म्हणाली…
mahima mhatre returned to work 15 days after accident credit to mother
सध्या महिमाच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. ‘तुला जपणार आहे’ मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, आगामी काळात ती आणखी कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडेही चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
हे पण वाचा.. संजय दत्तांच्या ‘अफजलखान’ लूकने दिशा परदेशी घाबरली; ‘राजा शिवाजी’च्या सेटवरील अनुभव केला शेअर









