dnyanada ramtirthkar harshad haldi ceremony video viral : मराठी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी साखरपुड्याची घोषणा करून चाहत्यांना आनंदाचा धक्का देणारी ही अभिनेत्री आता लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. ज्ञानदाच्या लग्नाची तयारी दोन्ही कुटुंबांकडून उत्साहात सुरू असून, लग्नाआधीच्या विविध पारंपरिक कार्यक्रमांनाही सुरुवात झाली आहे. अशातच तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या हळदी समारंभातील खास क्षण सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहेत.
ज्ञानदाचा होणारा नवरा हर्षद आत्माराम हा सिनेमॅटोग्राफी क्षेत्राशी संबंधित आहे. तो एक DOP आणि सिनेमॅटोग्राफर म्हणून काम करतो. अनेक कलाकृतींमध्ये त्याने महत्त्वाची जबाबदारी सांभाळली असून, ‘बंधू’ या चित्रपटासाठीही त्याने सिनेमॅटोग्राफर म्हणून काम केलं होतं. त्यामुळे कला आणि मनोरंजन क्षेत्राशी त्याचं जवळचं नातं असल्याचं बोललं जातं.
सध्या सोशल मीडियावर हर्षदच्या हळदी समारंभातील काही व्हिडीओ जोरदार चर्चेत आहेत. हर्षदने स्वतः हे खास क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केले असून, कुटुंबीयांसोबत त्याने केलेली धमाल चाहत्यांना खूप आवडत आहे. विशेषतः आईसोबत केलेला त्याचा उत्स्फूर्त डान्स सध्या नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून भरभरून प्रतिक्रिया येत असून, अनेकांनी या जोडीला शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
ज्ञानदा आणि हर्षद यांची ओळख अनेक वर्षांपासूनची असल्याचं सांगितलं जात आहे. २०१५ मध्ये त्यांची पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली आणि पुढे हे नातं प्रेमात बदललं. २०१९ मध्ये हर्षदने ज्ञानदाला लग्नासाठी विचारलं आणि त्यानंतर त्यांच्या नात्याची नवी सुरुवात झाली. अनेक वर्षे एकमेकांना समजून घेतल्यानंतर आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी ज्ञानदासाठी खास केळवण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिकेतील कलाकारांनी तिच्यासाठी खास पारंपरिक जेवणाचा बेत केला होता. सुंदर सजावट, खास वातावरण आणि कलाकारांची उपस्थिती यामुळे हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला. अभिनेत्री नम्रता प्रधानने या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. तसेच अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनीदेखील या कार्यक्रमात उपस्थित राहून ज्ञानदाला शुभेच्छा दिल्या.
हे पण वाचा.. अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकरच्या घरी सुरु झाली लग्नाची लगबग, मेहंदी सोहळ्याचे फोटो चर्चेत
dnyanada ramtirthkar harshad haldi ceremony video viral
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झाल्यास, ज्ञानदा सध्या ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकेत काव्या ही भूमिका साकारताना दिसत आहे. तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. याआधी तिने ‘ठिपक्यांची रांगोळी’, ‘सख्या रे’, ‘शतदा प्रेम करावे’ आणि ‘जिंदगी नॉट आऊट’ यांसारख्या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तिच्या लग्नसोहळ्याच्या बातम्यांमुळे तिचे चाहते आणखी उत्सुक झाले आहेत.
हे पण वाचा.. स्वानंदीच्या मनात अखेर उमटलं प्रेम; समर-किमयाच्या जवळीकीने ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत भावनिक ट्विस्ट









