‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली असून काहीच दिवसांत तिने आपलं स्वतंत्र स्थान मिळवलं आहे. प्राप्ती रेडकर आणि सायकित कामत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या कथानकात प्रेक्षकांना कुटुंब, नाती आणि त्यातील संघर्षाचा अनुभव मिळतो. आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार असून छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मानसी कुलकर्णीची एन्ट्री होणार आहे.
स्टार प्रवाहने नुकताच या मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित केला. त्यात सुरुवातीला सारंगला (सायंकित कामत) पुरस्कार सोहळ्यात “हा सन्मान कोणाला अर्पण कराल?” असा प्रश्न विचारला जातो. त्यावर तो डोळसपणे “माझ्या पत्नी सावलीला” असं उत्तर देतो. पुढे सावली आणि सारंग दोघे मिळून आपलं नातं अटूट असल्याचं ठामपणे सांगताना दिसतात.
मात्र पुढच्या क्षणाला मानसी कुलकर्णीची एन्ट्री होते आणि वातावरणच बदलून जातं. ती थेट सावलीवर प्रहार करत म्हणते, “दहा वर्षं मी हा पुरस्कार मिळवत आलेय, आणि आता ही रंग नसलेली मुलगी मला सौंदर्य शिकवणार?” तिच्या या संवादातून स्पष्ट होतं की आता मालिकेत प्रेक्षकांना प्रचंड नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे.
याआधी मानसीला प्रेक्षकांनी ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेत पाहिलं आहे. त्यात तिने खलनायिकेची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली होती. शिवानी सुर्वे आणि समीर परांजपे यांच्या सोबत झळकलेल्या या मालिकेत मानसीच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
“‘वहिनी आल्या का?’ नेटकऱ्यांचा प्रश्न; शेजारी उभी ‘ती’ कोण Suraj Chavanचा फोटो व्हायरल”
आता ‘Savlyachi Janu Savali’ मध्ये तिची भूमिका नेमकी कशी असेल, ती सावली–सारंगच्या संसारात किती गोंधळ घालणार, आणि या नव्या वादळाला दोघं कसं सामोरं जातील याकडे प्रेक्षकांची उत्सुकता लागली आहे. मालिकेच्या पुढील भागांमध्ये या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि त्याचबरोबर या मालिकेची लोकप्रियता आणखी वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.









