Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकर आपल्या खास दिग्दर्शन शैलीसाठी ओळखले जातात. त्यांनी सामाजिक, ऐतिहासिक तसेच प्रेक्षकांच्या मनाला भिडणाऱ्या अनेक कथांवर आधारित चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत त्यांच्या आगामी ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटामुळे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून त्याने प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवली आहे.
हा चित्रपट 2009 साली प्रदर्शित झालेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या गाजलेल्या चित्रपटाचा सिक्वल आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटातूनही मराठी माणसाचा स्वाभिमान आणि समाजातील परिस्थितीवर तीक्ष्ण भाष्य करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, या वेळी मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
झी स्टुडिओ मराठीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सुरुवातीलाच “मराठी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, आमच्या सोसायटीत आम्ही घाटी लोकांना ठेवत नाही” असा संवाद ऐकू येतो आणि त्यानंतर सिद्धार्थ बोडकेची दमदार एन्ट्री दिसते. धोतर, खांद्यावर घोंगडी, हातात काठी आणि घोड्यावरून उतरण्याचा त्याचा अंदाज यामुळे त्याचा लूक विशेष उठून दिसतो. Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser.
टीझरमध्ये तो लोकांना विचारताना दिसतो, “काय झालं, भांडण कशावरून सुरू आहे?” त्यावर सोसायटीतील लोकांचा उत्तर येतं – “घाटी लोकांना घर नाही देत आम्ही.” त्यानंतर सिद्धार्थचा संवाद प्रभावी ठरतो – “घाटी म्हणजे घाटावर राहणारे, तेच सह्याद्रीच्या रांगांमध्ये राहणारे आणि स्वराज्यासाठी रक्त सांडणारे शूरवीरांचे वारसदार. अशा रांगड्या गड्याला त्याच्या स्वतःच्या राजधानीत राहू द्यायचं नाही का?” या संवादाने प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.
“दुसऱ्या लग्नानंतर नवऱ्याला कर्करोग; पण अभिज्ञा भावेच्या आयुष्यातील खरी ताकद ठरली पालकांची साथ!”
टीझरमधून केवळ एका व्यक्तीचा संघर्ष नाही तर मुंबईत मराठी माणसाला मिळणारी वागणूक, त्याचं अस्तित्व, त्याची ओळख यांसारख्या संवेदनशील मुद्यांवर भाष्य केलं गेलं असल्याचं स्पष्ट होतं. महेश मांजरेकरांची हातोटी, सिद्धार्थ बोडकेचा रांगडा लूक आणि दमदार संवाद यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच आकर्षण ठरणार आहे.
या चित्रपटात सिद्धार्थसोबत सयाजी शिंदे, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शशांक शेंडे, पृथ्वीक प्रताप, पायल जाधव आणि त्रिशा ठोसर यांसारखे दमदार कलाकारही झळकणार आहेत. टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांकडून तसेच कलाकारांकडूनही चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त होत आहे. Punha Shivaji Raje Bhosle Movie Teaser
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या 31 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या तरी टीझरमुळेच चित्रपटाबद्दलची चर्चा रंगू लागली आहे.









