gharo ghari matichya chuli new entry dhanashri kadgaonkar saurabh choughule : ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. कौटुंबिक कथानक, भावनिक प्रसंग आणि कलाकारांचा दमदार अभिनय यामुळे या मालिकेने छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेत आता मोठे बदल पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपासून मालिकेत नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे कथानकात नवे वळण येण्याची चर्चा रंगली आहे.
मालिकेत हृषिकेश रणदिवेच्या बहिणीची भूमिका अभिनेत्री भक्ती देसाई साकारत होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगली पसंती मिळाली होती. मात्र, अलीकडेच भक्तीने मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तिच्या एक्झिटनंतर प्रेक्षकांमध्ये चर्चांना उधाण आले होते. आता तिच्या जागी अभिनेत्री धनश्री काडगावकरची एन्ट्री करण्यात आली आहे.
धनश्री काडगावकर याआधी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये झळकली आहे. विशेषतः ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील तिच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली होती. आता ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये तिची एन्ट्री झाल्याने कथानकाला नवे रंग मिळणार असल्याचं बोललं जात आहे. मालिकेच्या सेटवर सर्व कलाकारांनी आपलेपणाने स्वागत केल्यामुळे नवीन टीमसोबत काम करताना वेगळेपणा जाणवत नसल्याची भावना धनश्रीने व्यक्त केली आहे.
याचबरोबर मालिकेत आणखी एका कलाकाराची भर पडली आहे. अभिनेता सौरभ चौघुले आता या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘जीव माझा गुंतला’ मालिकेमुळे सौरभला मोठी लोकप्रियता मिळाली होती. मराठीसोबतच त्याने हिंदी मालिकांमध्येही काम करून स्वतःची छाप पाडली. आता तो ‘विक्रांत’ या व्यक्तिरेखेतून पुन्हा मराठी मालिकाविश्वात दमदार पुनरागमन करत आहे. याआधी ही भूमिका अभिनेता अक्षय वाघमारे साकारत होता. त्यामुळे सौरभच्या एन्ट्रीनंतर मालिकेच्या कथानकात मोठे ट्विस्ट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेच्या वेळेतही काही महिन्यांपूर्वी बदल करण्यात आला होता. पूर्वी प्राइम टाइममध्ये प्रसारित होणारी ही मालिका आता रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. वेळ बदलूनही मालिकेची लोकप्रियता कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
gharo ghari matichya chuli new entry dhanashri kadgaonkar saurabh choughule
या मालिकेत रेश्मा शिंदे, सुमीत पुसावळे, आशुतोष पत्की, प्रतीक्षा मुणगेकर आणि सविता प्रभुणे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. आता नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे आगामी भागांमध्ये नेमके कोणते बदल घडणार आणि कथेला कोणते नवे वळण मिळणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा.. सायलीला भूतकाळ आठवणार! सुभेदारांच्या दोन्ही सुना गरोदर; प्रियाचा नवा डाव पुन्हा अश्विनला अडकवणार?









