hruta durgule saasubai entry in anandi serial star pravah : ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय ‘आनंदी’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील सततच्या ट्विस्टमुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढताना दिसत आहे. आनंदी आणि युगंधर यांच्या लग्नानंतर कथानकात मोठा बदल पाहायला मिळत असतानाच आता मालिकेत आणखी एका प्रभावी पात्राची एन्ट्री होणार आहे. विशेष म्हणजे ही भूमिका अभिनेत्री मुग्धा शहा साकारणार असून त्यांच्या आगमनामुळे मालिकेत नवं वादळ निर्माण होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
मुग्धा शहा या अभिनेत्री हृता दुर्गुळे यांच्या सासूबाई म्हणूनही ओळखल्या जातात. अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात सक्रिय असलेल्या मुग्धा शाहांनी विविध मालिका आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. आता त्या ‘आनंदी’ मालिकेत शिल्पा निंबाळकर या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत. ‘दुर्वा’ मालिकेनंतर तब्बल १३ वर्षांनी त्या पुन्हा ‘स्टार प्रवाह’सोबत काम करत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या नव्या भूमिकेबद्दल बोलताना मुग्धा शाहांनी त्यांच्या अभिनय प्रवासाविषयीही खुलासा केला. गेली ३५ वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी बहुतांश वेळा नकारात्मक भूमिका साकारल्याचं सांगितलं. त्यांच्या मते, शिल्पा निंबाळकर ही व्यक्तिरेखा देखील अत्यंत प्रभावशाली आणि ठाम स्वभावाची आहे. निंबाळकर कुटुंबात तिचा मोठा दबदबा असून ती युगंधरची मोठी बहीण आहे.
कथानकानुसार, शिल्पाने प्रेमासाठी एका गरीब तरुणाशी विवाह केला होता. मात्र लग्नानंतर तिला मूल होत नसल्याने तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलं. या घटनेमुळे तिच्या मनात गरीब लोकांविषयी प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. पैशासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात, असा तिचा ठाम विश्वास बनला आहे. त्यामुळे ती प्रत्येक व्यक्तीकडे संशयाने पाहते. मात्र दुसऱ्या बाजूला तिचं युगंधरवरील प्रेम निस्वार्थी आहे. आपल्या भावासाठी ती कोणतीही मर्यादा ओलांडू शकते.
युगंधर आणि आनंदीच्या लग्नाची माहिती शिल्पाला मिळाल्यानंतर मालिकेच्या कथानकात मोठं नाट्य रंगणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना अनेक धक्कादायक घडामोडी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा.. राजा शिवाजी” पाहायचं राहून गेलं… अभिनेत्री दिशा परदेशीने वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
hruta durgule saasubai entry in anandi serial star pravah
दरम्यान, ‘आनंदी’ मालिकेत अभिनेत्री जाई खांडेकर आणि अभिनेते समीर धर्माधिकारी प्रमुख भूमिकांमध्ये झळकत आहेत. तसेच अभिनेता विकास पाटील खलनायक विद्याधर निंबाळकरची भूमिका साकारत असून त्यांच्या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पैशाचा माज, उर्मट स्वभाव आणि अय्याशी वृत्ती असलेल्या विद्याधरमुळे मालिकेतील संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे.
हे पण वाचा.. अनुष्का सरकटे-निखिल चव्हाणच्या साखरपुड्याची चर्चा; अभिनेत्रीने सांगितलं झटपट निर्णयामागचं खास कारण
‘आनंदी’ ही मालिका सध्या ‘स्टार प्रवाह’वर रात्री ९:३० वाजता प्रसारित केली जाते आणि प्रत्येक नव्या भागासोबत प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढताना दिसत आहे.









