ghabadkund actress scary look marathi movie rangi smita paygude : ‘घबाडकुंड’ या आगामी मराठी चित्रपटाची सध्या प्रेक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. रहस्य, गूढता आणि थरार यांचा संगम असलेल्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये आधीपासूनच मोठी उत्सुकता होती. आता या चित्रपटात आणखी एका दमदार अभिनेत्रीची एन्ट्री झाल्याने चर्चेला अधिक उधाण आले आहे. अभिनेत्री स्मिता पायगुडे अंजुटे या ‘घबाडकुंड’मधून एका वेगळ्याच अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या व्यक्तिरेखेचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचं नाव ‘रंगी’ असं असून या व्यक्तिरेखेला एक गूढ आणि भयावह बाजू असल्याचं पोस्टरमधून स्पष्ट दिसत आहे. तीक्ष्ण नजर, अंगावर काटा आणणारा लूक आणि काळ्या जादूशी जोडलेली पार्श्वभूमी यामुळे ‘रंगी’ ही व्यक्तिरेखा कथानकात विशेष महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे. पोस्टरवर झळकलेली “नजरेत धग अन् रग हिच्या अंगी, भल्या-भल्यांना घाम फोडते… नाव हिचं रंगी…!” ही टॅगलाईन सध्या प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे.
स्मिता पायगुडे यांनी यापूर्वी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारून अभिनयाची छाप सोडली आहे. मात्र ‘घबाडकुंड’मधील त्यांचा हा अवतार पूर्णपणे वेगळा असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनयासोबतच थिएटर आणि मेकअप क्षेत्रातील अनुभवाचा फायदा या व्यक्तिरेखेला साकारताना झाल्याचं स्मिता यांनी सांगितलं आहे. ‘रंगी’ ही भूमिका आपल्या कारकिर्दीतील अत्यंत खास भूमिका असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
या चित्रपटात कुशल बद्रिके, संदीप पाठक, शशांक शेंडे, प्राजक्ता हनमघर, वैष्णवी कल्याणकर आणि देवदत्त नागे यांसारखी दमदार कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दलची अपेक्षा आणखी वाढली आहे. प्रत्येक कलाकाराची वेगळी व्यक्तिरेखा आणि त्यामागील गूढ कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणार असल्याचं बोललं जात आहे.
निर्माते रसिक कदम आणि दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘घबाडकुंड’ हा चित्रपट थरार, रहस्य आणि अंधश्रद्धेच्या छायेत उलगडणारी कथा घेऊन येत आहे. चित्रपटाचा टीझर आणि पात्रांचे लूक समोर आल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
हे पण वाचा.. कमळी फेम केतकी कुलकर्णीचं पन्हाळा गडावर खास फोटोशूट
ghabadkund actress scary look marathi movie rangi smita paygude
आता ‘रंगी’च्या एन्ट्रीनंतर या चित्रपटातील रहस्य नेमकं काय आहे, याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ‘घबाडकुंड’ हा चित्रपट येत्या १९ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून मराठी चित्रपटप्रेमींना एका वेगळ्या अनुभवाची मेजवानी मिळणार असल्याचं चित्र सध्या दिसत आहे.
हे पण वाचा.. सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकरचे बेळगावमधील सेटवरील खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल









