raj more fitness secret : मराठी मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता Raj More सध्या त्याच्या फिटनेस आणि साध्या जीवनशैलीमुळे चर्चेत आला आहे. अभिनयाबरोबरच सोशल मीडियावर सक्रिय असलेला राज आपल्या चाहत्यांसोबत अनेक वैयक्तिक गोष्टी शेअर करत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने आपल्या आहाराच्या सवयी, व्यायामाची पद्धत आणि वजन कमी करण्यामागचं रहस्य उघड केलं.
राजने सांगितलं की, मालिकांच्या शूटिंगदरम्यान वेळेचं कोणतंही बंधन राहत नाही. त्यामुळे त्याच्या जेवणाच्या वेळाही पूर्णपणे बदलल्या होत्या. विशेषतः रात्री उशिरा जेवण करण्याची सवय त्याच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरत होती. अनेकदा रात्री अकरा-बारा किंवा त्याहून उशिरा जेवण व्हायचं. मात्र, हीच सवय बदलल्यानंतर त्याच्या शरीरात मोठा फरक जाणवू लागला. नियमित व्यायाम आणि नियंत्रित दिनचर्येमुळे त्याने तब्बल पाच किलो वजन कमी केल्याचं सांगितलं.
राजच्या मते फिटनेससाठी महागडा डाएट प्लॅन किंवा कठीण नियमांची गरज नसते. घरचं साधं आणि पौष्टिक जेवण शरीरासाठी सर्वात फायदेशीर असतं. त्याच्या डब्यात रोज एखादी पालेभाजी असतेच. पालकाची भाजी, तांदळाची भाकरी आणि पनीर हे पदार्थ तो आवडीने खातो. याशिवाय सलाड हा त्याच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. तो दररोज ताक पितो आणि ते पचनासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचंही सांगतो.
दिवसभरातील स्नॅक्समध्ये तो भाजलेले शेंगदाणे, ड्रायफ्रूट आणि प्रोटीन शेक घेतो. प्रोटीन शेकमध्ये चिया सीड्स मिसळण्याची त्याची खास सवय आहे. शरीराला आवश्यक प्रोटीन मिळावं यासाठी तो प्रत्येक जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा प्रयत्न करतो.
राजने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली ती म्हणजे त्याला गोड पदार्थ फारसे आवडत नाहीत. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणं त्याच्यासाठी तुलनेने सोपं गेलं. सकाळी नाश्ता न केल्याने त्याला विशेष फरक पडत नाही, कारण त्याला सकाळी फार भूक लागत नाही. मात्र, कधी नाश्ता केला तर पोहे, अंडी, ऑमलेट किंवा ऑमलेट सँडविच हे पदार्थ त्याच्या आवडीचे आहेत.
हे पण वाचा.. ज्ञानदा रामतीर्थकरच्या उखाण्यातून समोर आली भन्नाट लव्ह स्टोरी..
व्यायामाबद्दल बोलताना राज म्हणाला की, तो आठवड्यातून चार ते पाच दिवस नियमित वर्कआउट करतो. आधी फिटनेसकडे फारसं लक्ष दिलं जात नव्हतं, पण गेल्या काही महिन्यांपासून त्याने स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यायला सुरुवात केली आहे. शूटिंगदरम्यान वेळ मिळेल तसा तो सेटवरही व्यायाम करण्याचा प्रयत्न करतो.
स्वयंपाकाबाबतही राजने मजेशीर खुलासा केला. पोळी आणि भाकरी सोडली तर जवळपास सर्व पदार्थ बनवता येतात असं त्याने हसत सांगितलं. मांसाहाराची आवड असल्याचंही त्याने स्पष्ट केलं. मात्र, रोजच्या आहारात पालेभाज्या आणि साधं घरगुती जेवण असणं त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं असल्याचं त्याने नमूद केलं.
हे पण वाचा.. पद्मिनी : ९ मेपासून सुरू होणार रहस्य, भय आणि सूडाने भरलेली नवी मराठी मालिका
raj more fitness secret
फिटनेस म्हणजे केवळ वजन कमी करणं नसून शरीर आणि मन निरोगी ठेवणं आहे, असा संदेश राज मोरेच्या या साध्या पण शिस्तबद्ध जीवनशैलीतून मिळताना दिसतो.









