veen doghantali hi tutena hemant sonawane kelvan ceremony : ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून मालिकेतील प्रत्येक पात्र घराघरात लोकप्रिय झालं आहे. मालिकेच्या कथानकात नुकताच एक नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. समर आणि स्वानंदी यांच्या आयुष्यात ‘किमया’ या नव्या पात्राची एंट्री झाली असून अभिनेत्री पूर्वा गोखले ही भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे, अनेक वर्षांनंतर पूर्वा गोखले आणि सुबोध भावे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र झळकत असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
या चर्चांदरम्यान आता मालिकेच्या सेटवरून आणखी एक खास बातमी समोर आली आहे. मालिकेचे निर्माते हेमंत सोनावणे लवकरच विवाहबंधनात अडकणार असून त्यांच्या लग्नाआधी टीमने त्यांच्यासाठी पारंपरिक पद्धतीने केळवणाचा कार्यक्रम आयोजित केला. संपूर्ण युनिटने मिळून हा सोहळा आनंदात आणि उत्साहात साजरा केला. या सेलिब्रेशनचे काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांकडून त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात मालिकेतील महिला कलाकारांनी औक्षण करून केली. त्यानंतर हेमंत सोनावणे यांनी मजेशीर उखाणा घेत उपस्थितांची दाद मिळवली. कलाकार आणि प्रोडक्शन टीमने मिळून त्यांना खास भेटवस्तूही दिल्या. या सोहळ्यासाठी करण्यात आलेली सजावट देखील लक्षवेधी ठरली. केळीच्या पानांवर सुंदर फुलांची आरास करण्यात आली होती. पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या ताटांमुळे संपूर्ण वातावरण अधिकच खास झालं होतं.
हे पण वाचा.. वीण दोघांतली ही तुटेना’मध्ये किमयाची भूमिका स्वीकारण्यामागचं पूर्वा गोखलेने सांगितलं कारण म्हणाली..
या केळवण सोहळ्यात मालिकेतील प्रमुख कलाकार तेजश्री प्रधान, सुबोध भावे यांच्यासह इतर सर्व कलाकार उपस्थित होते. मालिकेतील स्वानंदी, समर, नलिनी आजी, मल्लिका, रोहन, दिलीप आणि अंशुमन राजवाडे ही पात्र साकारणारे कलाकार देखील या आनंदसोहळ्याचा भाग बनले होते. पडद्यावर दिसणारी त्यांची केमिस्ट्री प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच घट्ट असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळालं.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी हेमंत सोनावणे यांना नवीन आयुष्याच्या प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कलाकार आणि तांत्रिक टीममधील जिव्हाळा आणि मैत्री पाहून चाहत्यांनीही या टीमचं कौतुक केलं आहे.
हे पण वाचा.. आई कुठे काय करते’ फेम राधा सागरची थायलंड ट्रिप अंडरवॉटर सी वॉक अनुभव चर्चेत
veen doghantali hi tutena hemant sonawane kelvan ceremony
दरम्यान, ‘वीण दोघांतली ही तुटेना’ ही मालिका सध्या सायंकाळी ७:१५ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेचा वाढवलेला वेळ आणि कथानकातील नवे बदल यामुळे प्रेक्षकांचा उत्साह आणखी वाढलेला दिसत आहे.









