‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या ‘उदे गं अंबे’ ( Ude Ga Ambe End ) या लोकप्रिय मालिकेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी ही मालिका थांबणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता स्पष्ट झालं आहे की मालिका संपणार नसून केवळ काही काळासाठी थांबणार आहे.
‘उदे गं अंबे’ या पौराणिक मालिकेने प्रेक्षकांवर आपली छाप पाडली आहे. या मालिकेत साडेतीन शक्तिपीठांचं महत्त्व आणि त्यांचा इतिहास प्रभावीपणे मांडण्यात आला.
११ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू झालेली ही मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या मालिकेत अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री मयुरी कापडणे यांनी अनुक्रमे आदिशक्ती आणि शिवशंकराची भूमिका साकारली आहे. त्यांच्यासह गिरीश परदेशी, आराध्या लवाटे, क्षमा देशपांडे, ओमकार कर्वे आणि प्रसिद्धी किशोर यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारत मालिकेला उंचीवर नेलं.
सुरुवातीला या मालिकेच्या संपण्याच्या चर्चांमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. मात्र, मालिकेचे कलाकार आणि निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे की ही मालिका संपणार नसून केवळ ‘अल्पविराम’ घेणार आहे. मालिकेत साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिलं शक्तिपीठ, म्हणजेच माहूरच्या रेणुका देवीचं महात्म्य प्रभावीपणे सादर करण्यात आलं. आता उर्वरित शक्तिपीठांची गोष्ट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील नुकत्याच पार पडलेल्या ‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२४’ या सोहळ्यात ‘उदे गं अंबे’ मालिकेला विशेष सन्मान देण्यात आला. हा सन्मान स्वीकारताना कलाकारांनी प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार मानले. देवदत्त नागे आणि मयुरी कापडणे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की, “प्रेक्षकांनी जेवढी माया आणि प्रेम आम्हाला दिलं तेवढंच प्रेम ‘उदे गं अंबे’ या मालिकेलाही मिळालं. आई रेणुका देवीच्या महात्म्याची गोष्ट सादर करण्याची संधी आम्हाला मिळाली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.” Ude Ga Ambe End
देवदत्त नागे पुढे म्हणाले, “या मालिकेच्या निमित्ताने आम्हाला आईची महती घराघरात पोहोचवण्याची संधी मिळाली. आम्ही आजवर जे काही केलं, ती सेवा देवीच्या चरणी समर्पित आहे आणि प्रेक्षकांनी आम्हाला दिलेल्या प्रेमाबद्दल आम्ही ऋणी आहोत.
ही मालिका थांबत असली तरी हा पूर्णविराम नाही, हा केवळ अल्पविराम आहे. आईची कथा एवढी मोठी आहे की ती काही भागांमध्ये सांगून संपणारी नाही. त्यामुळे लवकरच नव्या अध्यायासह आम्ही पुन्हा भेटू.”
‘स्टार प्रवाह’ आणि ‘कोठारे व्हिजन’ यांचे आभार मानताना नागे आणि कापडणे यांनी सांगितलं की, “ही मालिका आमच्या हृदयात खास स्थान ठेवते. लवकरच उर्वरित शक्तिपीठांची गोष्ट घेऊन आम्ही परत येऊ. तोपर्यंत हा अल्पविराम आहे, निरोप नाही.”
‘उदे गं अंबे’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात जो भक्तिभाव जागवला आहे, तो असाच कायम राहो आणि पुढील अध्याय प्रेक्षकांच्या मनात तेवढीच उत्सुकता निर्माण करो, अशी अपेक्षा कलाकारांनी व्यक्त केली.