ठरलं तर मग ही लोकप्रिय मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये वात्सल्य आश्रम केसाचा निकाल लागल्यानंतर आश्रम पुन्हा सुरु करण्यात आल्याचं दाखवलं जात आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर हे आश्रमाचे दरवाजे पुन्हा एकदा उघडले जात आहेत.
या विशेष प्रसंगी संपूर्ण सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबीय आश्रमाला भेट देतात. सायली आणि अर्जुनकडे सगळे मनापासून माफी मागतात. या दोघांवर जो अविश्वास दाखवला, त्याबद्दल सगळ्यांना खंत वाटते. मात्र, सायली त्यांना एक अट टाकते – “एकाच अटीवर माफ करेन… आयुष्यभर माझ्या हातचं जेवावं लागेल.” तिच्या या भावनिक शब्दांनी पूर्णा आजी तिला प्रेमाने मिठी मारते.
प्रत्येकाच्या भावना व्यक्त होत असताना, प्रतिमा आश्रमातील आठवणींमध्ये हरवून जाते. भिंतीवर एक चित्र पाहिल्यानंतर ती म्हणते, “हे माझ्या तन्वीचं चित्र आहे.” पण खरी धक्का देणारी गोष्ट म्हणजे हे चित्र सायलीने काढलेलं असतं, हे मधुभाऊंच्या लक्षात येतं. त्यामुळे त्यांच्या मनात संशय निर्माण होतो – सायलीच खरी तन्वी तर नाही ना?
मधुभाऊ या चित्राशी संबंधित जुन्या वहीतले पुरावे पाहू लागतात आणि त्याला सायलीच्या चित्राशी जुळत असल्याची खात्री पटते. त्याच क्षणी त्यांच्या मनात प्रियावरही शंका निर्माण होते – तिने आणखी एक खोटं सांगितलं तर?
आता खरी तन्वी कोण आहे, सायलीच ती आहे का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागांमध्ये कळणार आहे. हा विशेष भाग ८ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यान स्टार प्रवाहवर रात्री ८.३० वाजता प्रसारित होणार आहे.









