ADVERTISEMENT

Tharala Tar Mag : नागराजचं मन गोंधळलं, महिपतचे डाव रंगले; प्रियाची तुरुंगातून सुटण्यासाठी नवी खेळी, मधुभाऊंच्या सत्यामुळे सायली हादरली!

‘ठरलं तर मग’ मालिकेत नवे वळण! मधुभाऊ कोमात गेल्यामुळे सायलीची दुनिया उद्ध्वस्त झाली आहे. तर दुसरीकडे नागराजच्या हातून झालेल्या रक्तपातावर महिपत आनंदी आहे, पण प्रियाची तुरुंगातून सुटका करण्यासाठी नवी चाल रंगू लागली आहे. १७ ऑगस्टचा भाग प्रेक्षकांसाठी थरारक ठरणार आहे.
Tharala Tar Mag,

स्टार प्रवाहवरील प्रेक्षकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ सध्या एकामागोमाग एक थरारक वळण घेत आहे. १७ ऑगस्टच्या भागात मालिकेत भावनिक आणि रहस्यमय घटनांचा संगम पाहायला मिळाला.

मालिकेतील ज्येष्ठ कलाकार आणि सर्वांची लाडकी पूर्णा आजी (ज्योती चांदेकर) यांच्या निधनानंतर मालिकेत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या प्रसंगाने संपूर्ण वातावरणच शोकाकुल झाले. त्यानंतर अचानक मधुभाऊंना कोमा आल्यानं सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सायली हतबल झाली, आणि अर्जुनने तिच्या खांद्यावर आधार देत तिला धीर दिला. मात्र मधुभाऊंनी सांगितलेलं एक सत्य अर्जुनच्या मनातून काही केल्या जात नव्हतं — सायलीचे आई-वडील अजूनही जिवंत आहेत! या धक्कादायक गोष्टीचा उलगडा करण्याचं ठरवून अर्जुन पुढील पावलं टाकण्याच्या तयारीत आहे.

हे पण वाचा: ज्येष्ठ अभिनेत्री Jyoti Chandekar यांचे निधन; ‘ठरलं तर मग’ मधील पूर्णा आजीने घेतला निरोप, मराठी कलाविश्वत शोककळा

दरम्यान, प्रतिमा सायलीसाठी देवीसमोर साकडं घालत असते. “जिच्या आयुष्यात कधीच खरी माया मिळाली नाही, त्या सायलीसोबत हे का घडतं?” असा प्रश्न तिच्या मनाला छळतो. तिला सायलीबद्दल करुणा वाटत असली, तरी कल्पनासोबत असलेलं मतभेद अजूनही कायम आहेत. प्रतापकडून मधुभाऊंच्या कोमात गेल्याची बातमी कळल्यावर कल्पना हादरते, पण सुनेशी संवाद साधायला ती तयार नसते.

तर दुसरीकडे नागराज रक्ताने माखलेल्या हातांनी महिपतच्या दारी येतो. त्याच्या मनावर अपराधाचं ओझं आहे; “माझ्या हातून खून झाला आहे का?” असा प्रश्न त्याला बेचैन करतो. पण महिपत मात्र या घटनेवर खूश असतो आणि नागराजला धीर देतो. लगेचच तो साक्षीला फोन करून अपडेट देतो की मधुभाऊंच्या प्राणावर बेतलेला खेळ आता पूर्ण झाला आहे.

याचदरम्यान तुरुंगात बसलेली प्रिया तिच्या जुन्याच खेळात मग्न होते. अश्विन भेटायला येताच ती नेहमीसारखं रडगाणं सुरू करते. मात्र यावेळी ती मोठं गुपित उघड करते — महिपतने तुरुंगातील एका व्यक्तीला विकत घेतलं आहे. त्याच्यामार्फत साक्षीला बाहेरच्या घडामोडींची माहिती मिळते आणि प्रिया देखील याच नेटवर्कमुळे सगळं जाणून घेते. मधुभाऊंविषयी माहिती मिळाल्यावर ती त्यांच्याबद्दल भावनिक पुळका दाखवते आणि अश्विनसमोर त्यांना एकदा भेटण्याचा हट्ट धरते.

सायलीची अवस्था बेजार झालेली असली, तरी अर्जुनच्या मनात एकच गोष्ट ठाम आहे — मधुभाऊ शुद्धीवर यायलाच हवेत. कारण त्यांच्याकडून मिळालेलं सत्य सायलीच्या भविष्यासाठी फार महत्त्वाचं आहे. डॉक्टर मात्र आशेचा किरण दाखवतात; मधुभाऊ नवी ट्रीटमेंट स्वीकारत आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.

या सगळ्या घटनांमुळे ‘ठरलं तर मग’ मालिकेचा ट्रॅक प्रेक्षकांना अधिकच गुंतवून ठेवणारा ठरत आहे. सत्याचा उलगडा, कारस्थानं आणि कौटुंबिक भावनांचा संगम या मालिकेला अजून रंजक बनवतोय.