Tarini Serial : झी मराठीवर येतेय नवी तारिणी मालिका; शिवानी सोनारची जबरदस्त अ‍ॅक्शन एन्ट्री, गुन्हेगारांशी थेट दोन हात!

Tarini Serial Zee Marathi

झी मराठीवरील नव्या ‘तारिणी’ Tarini serial चा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. अभिनेत्री शिवानी सोनार एका धाडसी स्पेशल क्राइम युनिट ऑफिसरच्या भूमिकेत झळकणार असून, तिच्या हटके भूमिकेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे

मराठी टेलिव्हिजनवर पारंपरिक कौटुंबिक मालिकांच्या जोडीने आता साहस, थरार आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कथांचा प्रभाव वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर झी मराठीने ‘तारिणी’ Tarini Serial चा धमाकेदार प्रोमो नुकताच सादर केला असून, प्रेक्षकांच्या मनात या नव्या मालिकेबद्दल उत्सुकता अधिकच वाढली आहे.

‘तारिणी’ ही मालिका केवळ एक कौटुंबिक कथा नाही, तर तिच्यामध्ये एक जबरदस्त साहसी नायिका, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा आणि गूढ ओळख अशा अनेक अंगांनी गुंफलेली कहाणी आहे. या मालिकेत अभिनेत्री शिवानी सोनार ही नायिकेच्या मुख्य भूमिकेत झळकणार असून, तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक हटके पैलू प्रेक्षकांना पहिल्यांदाच पाहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये सुरुवातीला ‘तारिणी’ला एक साधी घरगुती मुलगी म्हणून दाखवण्यात आलं आहे. देवपूजेसाठी घरात तिचं स्थान असूनही, तिच्या सावत्र कुटुंबातील सदस्य तिला वारंवार अपमानित करताना दिसतात. आईने भ्रष्टाचार केल्यानंतर आत्महत्या केली, असा आरोप सतत तिच्यावर केला जातो. इतकंच नव्हे तर तिला ‘डरपोक’ आणि ‘कमीपणा’ अशीही विशेषणं ऐकावी लागतात.

पण खरी गोष्ट तिथून पुढे सुरू होते. अचानक एक घटना घडते – एका बाई आणि तिच्या लहान मुलीला गुंडांनी पकडलेलं असतं. हे कळताच तारिणी नऊवारी नेसून थेट त्या गुंडांवर धडक देते. तिच्या या मिशनमध्ये तिचा सहकारी (अभिनेता एन स्वराज) सुद्धा असतो. हीच वेगळी ओळख उघड होते – तारिणी ही एक ‘स्पेशल क्राइम युनिट’ची ऑफिसर आहे!

या प्रोमोमध्ये तिच्या हातात बंदूक असलेला सीन, तिचा आत्मविश्वास आणि गुंडांशी लढतानाचा धाडसी अवतार – हे सगळं बघून प्रेक्षक अक्षरश: थक्क झाले आहेत. शिवानी सोनारच्या या नव्या अ‍ॅक्शन अवताराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. ‘एकदम कडक’ अशा प्रतिक्रियांनी प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव झाला आहे.

या मालिकेत अभिज्ञा भावे एका महत्त्वाच्या भूमिकेत परतणार आहे. अनेक हिंदी मालिका व ओटीटी प्रोजेक्ट्समध्ये काम केल्यानंतर ती ‘तारिणी’च्या माध्यमातून मराठीत पुनरागमन करत आहे. तिच्या भूमिकेला एक सामाजिक संवेदनशीलता असून, ती या कथानकात वेगळा रंग भरणार आहे. त्याचबरोबर, उद्योजिका आरती वडगबाळकरदेखील या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

मालिकेचा प्रोमो पाहून अनेकांना हे लक्षात आलं की, ही मालिका बंगाली सुपरहिट ‘जगद्धात्री’ या मालिकेचा अधिकृत मराठी रिमेक आहे. या मालिकेतील कथा आणि सशक्त नायिकेचं व्यक्तिमत्त्व हेच मालिकेचं वैशिष्ट्य असणार आहे.

‘लपंडाव’ स्टार प्रवाह वर नवीन मालिका, रुपाली भोसले, चेतन वडनेरे आणि कृतिका देव झळकणार

‘तारिणी’ Tarini Serial लवकरच झी मराठीवर प्रसारित होणार असून, सध्या तरी सुरू होण्याची तारीख गुप्त ठेवण्यात आली आहे. परंतु, या मालिकेच्या आगमनामुळे झी मराठीवरील काही जुन्या मालिकांना निरोप द्यावा लागेल, अशीही चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली आहे.

थोडक्यात काय, पारंपरिक सासू-सुनेच्या नात्याच्या पलीकडे जात झी मराठी आता ‘तारिणी’ Tarini Serial च्या माध्यमातून एक सशक्त, संघर्षशील आणि समाजासाठी लढणाऱ्या स्त्रीचं रूप प्रेक्षकांसमोर आणणार आहे. अ‍ॅक्शन, भावना आणि गूढता यांनी भरलेली ही मालिका प्रेक्षकांना वेगळा अनुभव देणार हे नक्की!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *