tarini jj padmini 2 crore lach navin twist : ‘तारिणी’ ही झी मराठीवरील अशी मालिका आहे, ज्यामध्ये गुन्हेगारी तपास, कौटुंबिक संघर्ष आणि भावनिक नात्यांचा सुरेख मेळ पाहायला मिळतो. मालिकेतील प्रत्येक नवीन घडामोड प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. सध्या गुलाब प्रकरणामुळे कथानक अधिकच गुंतागुंतीचे झाले असून आता जेजेच्या भूमिकेबाबतही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
मालिकेत काही दिवसांपूर्वी गुन्हेगार गुलाबचा मृत्यू झाला. तपासादरम्यान गुलाब आणि युवराज यांच्यात संबंध असल्याचे समोर आले होते. गुलाबच्या काही गैरप्रकारांमध्ये युवराज त्याला मदत करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. रेव्ह पार्टी प्रकरणात स्पेशल क्राइम युनिटने गुलाबला पकडले होते, मात्र युवराजविरोधात ठोस पुरावे नसल्यामुळे त्याच्यावर तातडीने कारवाई करता आली नव्हती.
यानंतर मालिकेत एक महत्त्वाचा बदल झाला. साधू सरांच्या जागी जया जगदाळे म्हणजेच जेजे यांची नियुक्ती झाली. धाडसी निर्णय घेणारी, कडक शिस्तीची आणि आपल्या कामाप्रती प्रामाणिक अधिकारी म्हणून जेजेची ओळख निर्माण झाली आहे. तिच्या काम करण्याच्या वेगळ्या पद्धतीमुळे टीम तारिणीलाही तिच्याबद्दल आदर वाटतो.
हे पण वाचा .. शशांक केतकरचं दमदार कमबॅक! ‘कमळी’ मालिकेत साकारणार ‘रितेश सरपोतदार’ची भूमिका; प्रोमोने वाढवली उत्सुकता
मात्र आता समोर आलेल्या नव्या प्रोमोमुळे जेजेच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. युवराजला सोडवण्यासाठी त्याची आई पद्मिनी मोठा निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तारिणी आणि केदार खांडेकर कुटुंबातील सदस्यांच्या भूमिकांवर चर्चा करताना दिसतात.
यावेळी तारिणी सांगते की, जेजे मॅडम कठोर असल्या तरी त्या कधीही चुकीच्या मार्गावर जाणार नाहीत. त्या पैशांसाठी आपले कर्तव्य विसरणार नाहीत, असा विश्वास ती व्यक्त करते. मात्र त्याचवेळी पद्मिनी जेजेच्या कार्यालयात पोहोचते आणि तिच्यासमोर पैशांची बॅग ठेवते. युवराजला लॉकअपमधून बाहेर काढण्यासाठी ही रक्कम असल्याचे ती सांगते.
हे पण वाचा.. काहीही हं श्री पुन्हा ऐकायला मिळणार? शशांक केतकरचं दमदार कमबॅक; ‘कमळी’ मालिकेत होणार एन्ट्री
यानंतर प्रोमोमध्ये आणखी एक धक्कादायक प्रसंग पाहायला मिळतो. जेजे पद्मिनीच्या गाडीत बसून तिला सांगते की, सौदे करणारी माणसं ओळखता येतात, पण योग्य जागा निवडणंही महत्त्वाचं असतं. त्यावर पद्मिनी पैशांची बॅग पुढे करत किंमत विचारते. यावेळी जेजे थेट २ कोटी अशी रक्कम सांगते आणि पद्मिनी त्यावर होकार देताना दिसते.
या प्रोमोमुळे आता मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे की, जेजे खरंच पद्मिनीकडून पैसे घेणार आहे का, की हा तिच्या तपासाचा आणखी एक भाग आहे? कारण आतापर्यंत जेजेने आपल्या प्रामाणिकपणाची ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे तिच्या या वागण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
tarini jj padmini 2 crore lach navin twist
झी मराठीने या प्रोमोला “जेजेचा खरा चेहरा तारिणीसमोर येईल का?” अशी कॅप्शन दिली आहे. प्रोमो प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया येत असून आगामी भागात काय घडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.









