‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वामुळे घराघरांत पोहोचलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अंकिता वालावलकर( Ankita Walawalkar ) सध्या तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ‘बिग बॉस मराठी’चा महाअंतिम सोहळा पार पडताच लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची घोषणा तिने केली होती. त्यानंतर १६ फेब्रुवारी रोजी अंकिताने संगीत दिग्दर्शक कुणाल भगतसोबत थाटामाटात लग्नगाठ बांधली.
कुणाल भगत हा मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय संगीत दिग्दर्शक आहे. कुणाल आणि त्याचा सहकारी करण सावंत यांनी एकत्रितपणे अनेक मालिकांसाठी आणि चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन केलं आहे. अनेक मराठी मालिकांच्या शीर्षक गीतांपासून ते काही मराठी चित्रपटांच्या गाण्यांपर्यंत त्यांची मेहनत झळकते. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘येक नंबर’ चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. कुणाल केवळ संगीत क्षेत्रातच नव्हे तर सोशल मीडियावरही आपल्या कामामुळे चर्चेत राहतो.
नुकतेच कुणालने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर प्रश्नोत्तरांचा एक खास सेगमेंट ठेवत चाहत्यांशी संवाद साधला. या सेगमेंटमध्ये कुणालच्या चाहत्यांनी त्याला अनेक रोचक प्रश्न विचारले. विशेष म्हणजे ‘बिग बॉस मराठी’ फेम धनंजय पोवार अर्थात डीपी दादानेही या चर्चेत भाग घेतला. धनंजय आणि कुणाल यांची चांगली मैत्री असल्याने त्यांच्यातील गप्पा रंगतदार झाल्या.
हे पण वाचा..१७ वर्षांची nitanshi goel ने IIFA 2025 मध्ये बेस्ट अभिनेत्री पुरस्कार पटकावला
या चर्चेदरम्यान धनंजयने कुणालला एका खास प्रोजेक्टविषयी विचारणा केली. “चल लवकर प्रोजेक्ट सुरू करूया” असं धनंजयने विचारताच कुणालने थोडक्यात पण आश्वासक उत्तर दिलं, “लवकरच…” या छोट्याशा उत्तरामुळे दोघेही लवकरच कोणत्या तरी नव्या प्रोजेक्टवर काम करत असल्याचं संकेत मिळाले आहेत.
या नव्या प्रोजेक्टबद्दल अधिक माहिती समोर आलेली नसली तरी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. कुणाल आणि धनंजय नक्की कोणत्या प्रोजेक्टवर काम करत आहेत? हा प्रोजेक्ट मालिका असेल का एखादा चित्रपट? किंवा एखादं संगीत अल्बम असेल का? याविषयी सध्या कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र कुणालच्या “लवकरच…” या उत्तरामुळे चाहत्यांचे कुतूहल मात्र वाढलं आहे.
अंकिता आणि धनंजय यांचं ‘बिग बॉस’च्या घरात भाऊ-बहिणीचं खास नातं जुळलेलं पाहायला मिळालं होतं. ‘बिग बॉस’ संपल्यानंतरही त्यांनी हे नातं जपले. अंकितासोबतच कुणाल आणि धनंजय यांच्यातही घनिष्ठ मैत्री आहे. नुकतंच धनंजयने अंकिता आणि कुणालच्या लग्नात विशेष हजेरी लावली होती. लग्नसोहळ्यात धनंजयने मनसोक्त आनंद घेतला, ज्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.
आता कुणाल भगत आणि धनंजय पोवारच्या या नव्या प्रोजेक्टबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यांच्या चाहत्यांना आता दोघे कोणत्या नव्या प्रयोगासह प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.