swapnil joshi wife leena video happy married life talks : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) हे सोशल मीडियावर खास सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक. आपल्या कामाबरोबरच घरातील मजेदार क्षणही ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांनी पत्नी लीनाबरोबरचा एक हलकाफुलका आणि खट्याळ व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांना दिलखुलास हसवलं आहे. हा व्हिडिओ पोस्ट होताच सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून चाहत्यांसह अनेक कलाकारांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
व्हिडिओची सुरुवातच मजेशीर पद्धतीने होते. स्वप्नील जोशी कॅमेऱ्यात लीनाच्या पायाला लागलेलं प्लास्टर दाखवत सांगतो की लग्न नावाच्या रथाला दोन चाकं असतात – नवरा आणि बायको. “माझ्या संसाररूपी रथाचं एक चाक सध्या तुटलेलं आहे,” असं म्हणत तो पत्नीची गंमत उडवतो. त्यानंतर तो लीनाला विचारतो की त्यांच्या सुखी संसाराचं खरं रहस्य नक्की काय? त्यावर लीना हसत उत्तर देते, “सतत भांडत राहणं!” तिचं हे उत्तर ऐकून स्वप्नीलही खळखळून हसतो आणि आपलं मत समोर ठेवतो—“थोडं अंतर ठेवून राहिलं की नाती जास्त टिकतात. खूप बोलणं झालं की मग वाद वाढतात.”
यानंतर दोघांमध्ये सुरू होतात टोमणे आणि चिडवाचिडवी. स्वप्नील जेव्हा पत्नीला विचारतो की तिला त्याच्या कोणत्या सवयीचा राग येतो, तेव्हा लीना म्हणते, “तुला कोणत्याच गोष्टीचा राग येत नाही, हेच मला जास्त चिडवतं.” इतकंच नाही तर “मी पडले म्हटलं तर तू ‘Wow… कुठे?’ म्हणतोस,” असं म्हणत ती हसत त्याची क्लासही घेते. त्यावर स्वप्नील जोशी उत्तर देतो, “तू आत्ताच म्हणालीस ना मला राग येत नाही… त्याचाच मला राग येतो!” आणि पुन्हा नव्यानं दोघांचे हसण्यात बुडालेले संवाद सुरू होतात.
शेवटी स्वप्नील तिच्या हातून त्यांच्या नात्याला एक नाव मागतो. त्यावर लीना तत्काळ म्हणते, “टॉम अँड जेरी!” तिच्या या उत्तरामुळे व्हिडिओ अजूनच मजेशीर बनतो.
या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये स्वप्नील जोशी लिहितो की तो लीनाशी थट्टामस्करी करत होता आणि हा व्हिडिओ अनपेक्षितपणे इतका मजेदार बनला की हा क्षण चाहत्यांसोबत शेअर करावाच वाटला. प्रसाद ओक, मंजिरी ओक, समिधा गुरु, मधुगंधा कुलकर्णी यांसारख्या मित्रांनीही व्हिडिओवर गोड प्रतिक्रिया दिल्या आहेत.
स्वप्नील आणि लीनाच्या या हलक्याफुलक्या गप्पांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की छोट्या-छोट्या क्षणांमुळे नातं अधिक मजबूत होतं. त्यामुळेच स्वप्नील जोशी यांचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
हे पण वाचा.. अमृता खानविलकर ने वाढदिवशी केला खास खुलासा; त्या पोस्ट मुळे वाढली चाहत्यांची उत्सुकता









