मराठी मनोरंजनसृष्टीत लावणी म्हटली की सुरेखा कुडची ( Surekha Kudachi ) यांचं नाव हमखास आठवतं. अनेक चित्रपट आणि मालिका गाजवल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनमध्येही त्या झळकल्या होत्या. अभिनयासोबतच त्या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. सामाजिक मुद्द्यांवर परखड मतं मांडणाऱ्या सुरेखा कुडची यांनी नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या संघर्षांबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला.
lakshmi niwas : जान्हवी जयंतला घडवणार अद्दल, जयंत मागणार जान्हवीची माफी!
इंडस्ट्रीत पहिले पाऊल आणि पहिला धक्का ( Surekha Kudachi )
अभिनयाची आवड असलेल्या सुरेखा कुडची यांनी करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या. त्या काळात मुंबईतील आराम नगर हे कलाकारांसाठी महत्त्वाचं केंद्र होतं, जिथे अनेक ऑफिसेस आणि स्टुडिओ होते. त्याच भागातील एका ऑफिसमध्ये ऑडिशनसाठी गेलेल्या सुरेखा यांना त्या वेळी इंडस्ट्रीतली ‘ए ग्रेड’, ‘सी ग्रेड’ अशी विभागणी माहित नव्हती. त्या ऑफिसमध्ये भीतीदायक पोस्टर्स लावलेले होते, जे पुढे त्यांच्यासाठी अनपेक्षित अनुभवाचा भाग बनले.
सुरेखा कुडची ( Surekha Kudachi ) सांगतात, “त्या ऑफिसमध्ये काही ओळखीचे लोक होते. त्यामुळे मला वाटलं मी योग्य ठिकाणी आले आहे. पण तिथे पोहोचल्यावर मला एका चित्रपटात मुख्य भूमिका देण्याची ऑफर देण्यात आली. मात्र, त्यासोबतच त्यांनी विचित्र मागणीही केली – ‘तुम्ही आम्हाला काय देणार?’ मला त्यावेळी त्यांच्या बोलण्याचा खरा अर्थच समजला नाही. मी सहज उत्तर दिलं, ‘माझ्याकडे पैसे नाहीत, पण मी फुकट काम करायला तयार आहे.’ पण त्यांना त्याचा असा अर्थ नव्हता.”
त्या व्यक्तीने नंतर अधिक स्पष्ट करताच सुरेखा यांना हा प्रश्न पैशांसाठी नाही, तर काहीतरी वेगळ्या अपेक्षांसाठी विचारला गेला आहे, हे उमजलं. “तो सरळ विचारतो, ‘एका रात्रीचे किती पैसे घेणार?’ त्यावेळी मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला. इतकी घाबरले की, काहीही न बोलता माझ्या फोटोचा अल्बम उचलला आणि तिथून पळ काढला,” त्या आठवणींना उजाळा देताना सुरेखा कुडची आजही भावुक होतात.
त्या प्रसंगानंतर सुरेखा ( Surekha Kudachi ) यांना मनात अनेक प्रश्न पडले. खरंच या इंडस्ट्रीत राहावं का? इतक्या मोठ्या संघर्षाला सामोरं जायचं का? की सरळ घरी जाऊन लग्न करून स्थिर जीवन जगावं? हा धक्का सहन करणं सोपं नव्हतं, पण अभिनयाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
योग्य मार्ग सापडला आणि प्रवास सुरू झाला
अशाच मनःस्थितीत असताना एका ओळखीच्या व्यक्तीने त्यांना अनुभवी जयश्री बाईंशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला. ‘त्या महिला असल्याने निदान सुरक्षित वाटेल,’ असा विचार करून सुरेखा त्यांच्याकडे गेल्या. तिथे त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आणि त्यानंतर त्यांच्या करिअरला योग्य दिशा मिळाली. ( Surekha Kudachi )
आज त्या या सगळ्या अनुभवांना मागे टाकून मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करू शकल्या आहेत. मात्र, आजही नव्या कलाकारांनी अशा फसव्या ऑफर्सपासून सावध राहावं, असा सल्ला त्या देतात. संघर्षाच्या काळात आलेला हा प्रसंग आजही त्यांच्या स्मरणात आहे, पण त्याचसोबत स्वतःवर ठाम विश्वास ठेवल्यामुळेच त्या यातून बाहेर पडू शकल्या, असं त्या सांगतात.
या प्रसंगातून नवोदित कलाकारांनी शिकण्यासारखं खूप काही आहे. इंडस्ट्रीतील अडचणी, चुकीच्या लोकांचा प्रभाव, स्वप्नांमधली फसवणूक—या सगळ्याला सामोरं जाण्यासाठी दृढ निश्चय आणि योग्य माणसांची साथ गरजेची असते. सुरेखा कुडचींनी ज्या आत्मविश्वासाने आपला मार्ग निवडला आणि आज यश मिळवलं, ते निश्चितच प्रेरणादायी आहे.