Suraj Chavan meet Ajit Pawar: ‘बिग बॉस मराठी ५’चा विजेता आणि चर्चेत असलेला अभिनेता सूरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. अलीकडेच सूरजनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची खास भेट घेतली असून या भेटीमागचं कारण अत्यंत खास आहे. सोशल मीडियावर या दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत, आणि चाहत्यांमध्ये या भेटीबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
अजित पवारांनी स्वतः या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत सूरजसोबत झालेल्या संवादाचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिलं आहे की, “बारामतीचा सुपुत्र आणि बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाण यानं आज सदिच्छा भेट घेतली. त्याच्या नवीन घराचं बांधकाम उत्तमरित्या पूर्ण होत असून त्याबद्दल त्यानं समाधान व्यक्त केलं.” तसेच अजित पवारांनी सूरजला आयुष्यातील नव्या टप्प्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सूरजनं ‘बिग बॉस मराठी ५’ जिंकल्यानंतर अजित पवारांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्या घराचं बांधकाम गेल्या वर्षभरात वेगाने सुरू होतं आणि आता ते अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. सूरज लवकरच आपल्या या नवीन घरात राहायला जाणार असल्याचं समजतं.
याचबरोबर सूरजच्या वैयक्तिक आयुष्यातही एक खास प्रसंग उभा ठाकलाय. तो लवकरच संजना हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांचा विवाहसोहळा २९ नोव्हेंबर रोजी पुण्याजवळील जेजुरी–सासवड परिसरात पार पडणार आहे. लग्नापूर्वी २८ नोव्हेंबरपासून हळद, मेहंदी आणि संगीत यांसारख्या पारंपरिक विधींचा जल्लोष होणार असून सूरजच्या नवीन घरात या सोहळ्यांची विशेष तयारी करण्यात येत आहे.
सूरज चव्हाणनं आपल्या मेहनतीच्या जोरावर ‘बिग बॉस मराठी’च्या मंचावर लोकप्रियता मिळवली, आणि आज तो आपल्या स्वप्नातील घरात व नात्यात नव्या अध्यायाची सुरुवात करणार आहे. त्याची ही यशोगाथा आता चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
अमित भानुशालीचा जुन्या बॉलीवूड गाण्यावर जबरदस्त डान्स; ‘ठरलं तर मग’च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल!









