झी मराठीवरील ‘शिवा’ ही मालिका दीड वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आणि आता ही मालिका आपल्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे. ‘Shiva Serial Last Episode’ या टॅगलाईनने सोशल मीडियावर जोरदार चर्चेला उधाण आलं आहे, आणि मालिकेचा अंतिम भाग थरारक वळणावर येऊन ठेपलाय.
अलीकडेच मालिकेतील काही कलाकारांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करून शूटिंग संपल्याची माहिती दिली होती. आता या मालिकेचा अंतिम प्रोमो झी मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या प्रोमोनुसार, सुहासचं खोटं आणि धोकादायक रूप अखेर सर्वांसमोर उघड होणार आहे.
कथेच्या उत्कर्षबिंदूवर सुहास आपल्या खुनशी डावाने शिवाला अडकवण्याचा प्रयत्न करतो. त्याने शिवाच्या माहेरच्यांवर आणि सासरच्यांवर एकाच वेळी हल्ला घडवून आणलेला असतो. एवढंच नाही तर शिवाच्या घरात बॉम्ब ठेवून, “एकतर माहेरचं वाचव किंवा सासरचं – निवड कर,” असं म्हणत तो तिला मानसिकदृष्ट्या खचवण्याचा प्रयत्न करतो.
पण शिवा देखील हार मानणाऱ्यांपैकी नसते. ती ठामपणे सांगते, “आज मी एकटी नाही, माझ्यासोबत आहे स्पेशल क्राइम युनिटची ऑफिसर – तारिणी.” आणि याच तारिणीच्या रूपात लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनार शेवटच्या भागात खास एन्ट्री घेते.
तारिणीच्या मदतीने शिवा दोन्ही कुटुंबीयांना वाचवण्याचा प्रयत्न करते. माहेरी तारिणी धावते, तर सासरच्या लोकांसाठी शिवा स्वतः लढते. मात्र, सुहासच्या गुंडांकडून झालेल्या हल्ल्यात शिवा जखमी होते आणि बेशुद्ध पडते. तिची अवस्था पाहून उपस्थित सर्वजण भावनिक होतात.
तेवढ्यात तारिणी पुन्हा एकदा हस्तक्षेप करते आणि शिवाला लढण्याचं बळ देते. शुद्धीवर आल्यानंतर शिवा आणि तारिणी मिळून सुहासच्या गुंडांना चांगलाच धडा शिकवतात. अखेर सुहासचं खरं रूप सगळ्यांसमोर उघड होतं आणि ‘शिवा’ मालिकेचा शेवट एक सकारात्मक आणि भावनिक वळण घेतो.
शेवटी दोन्ही कुटुंब एकत्र येतात, शिवाला आपलं महत्त्व पटतं आणि तारिणीच्या मदतीबद्दल सर्वजण तिचे आभार मानतात. हा खास भाग ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी झी मराठीवर प्रसारित होणार आहे.
विशेष म्हणजे, ‘शिवा’ मालिकेचा निरोप घेतल्यानंतर ११ ऑगस्टपासून शिवानी सोनारच्या मुख्य भूमिकेतील ‘तारिणी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सोमवार ते शुक्रवार रात्री ९:३० वाजता तिचं प्रसारण होईल.









