sachin pilgaonkar urdu bhasha prem vaktavya : मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीत समान ताकदीनं आपली छाप सोडणारे ज्येष्ठ अभिनेते Sachin Pilgaonkar पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांच्या कोणत्याही चित्रपटामुळे नव्हे, तर उर्दू भाषेबद्दलच्या त्यांच्या प्रचंड प्रेमामुळे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अलीकडेच ‘बहार ए उर्दू’ या विशेष कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी स्टेजवर बोलताना सचिन यांनी आपल्या भाषेच्या आवडीबद्दल मनमोकळेपणाने व्यक्त होत सांगितले, “माझी मातृभाषा मराठी आहे, पण माझ्या विचारांची भाषा उर्दू आहे. मला रात्री तीन वाजता कोण उठवलं, तरी माझ्या तोंडून पहिलं वाक्य उर्दूतच बाहेर येतं. मी उर्दू भाषेसोबतच झोपतो आणि तिच्यासोबतच जागतो.” त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित प्रेक्षकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांनी विनोदी अंदाजात पुढे जोडले, “उर्दू हीच ती एकमेव सवत आहे, जी माझ्या पत्नीला पण आवडते.”
सचिन पिळगांवकर यांचं उर्दूप्रेम आजचं नाही. बालकलाकार म्हणून काम करत असतानाच त्यांनी ही भाषा आत्मसात करायला सुरुवात केली होती. ते फक्त १० वर्षांचे असताना त्यांनी दिग्गज अभिनेत्री Meena Kumari यांच्यासोबत ‘मझली दीदी’ या चित्रपटात काम केलं होतं. त्या काळात मीना कुमारी यांनी स्वतः त्यांच्या घरी दर आठवड्याला चार वेळा सचिन यांना उर्दूचे धडे द्यायचे. त्या दिवसापासूनच त्यांच्या मनात या भाषेबद्दलचं प्रेम रुजलं आणि वर्षानुवर्षे ते अधिक घट्ट होत गेलं.
सचिन पिळगांवकर यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत तितकाच प्रभावी ठसा उमटवला आहे. हिंदीत ‘शोले’, ‘नदिया के पार’, ‘बचपन’, ‘ब्रह्मचारी’, ‘सत्ते पे सत्ता’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. तर मराठी प्रेक्षकांच्या मनात ‘अशी ही बनवा बनवी’, ‘नवरा माझा नवसाचा’ आणि ‘आयत्या घरात घरोबा’ या चित्रपटांमधील त्यांच्या अभिनयाने वेगळीच ओळख निर्माण केली.
त्यांच्या आठवणींचा खजिना प्रचंड आहे. अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी मधुबाला, संजीव कुमार यांच्यासारख्या कलाकारांसोबतचे अनुभवही सांगितले आहेत. आज उर्दू भाषा त्यांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि त्याबद्दल ते नेहमीच अभिमानाने बोलतात.
हे पण वाचा.. मृण्मयी देशपांडेच्या ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचे प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवले
सचिन पिळगांवकर यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. भाषेच्या सीमारेषांपलीकडे जाऊन एखादी भाषा आपल्या हृदयात कशी स्थान मिळवू शकते, याचं सुंदर उदाहरण त्यांनी सर्वांसमोर ठेवलं आहे.
हे पण वाचा.. ‘लाखात एक आमचा दादा’ फेम नितीश चव्हाणचा खुलासा; म्हणाला, “एमएस धोनीच्या या गुणांमुळे तो माझा आवडता खेळाडू!”









