ADVERTISEMENT

रेश्मा शिंदेचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला या खास नावानं मारतो हाक! अभिनेत्रीचा गूगल सर्चबाबत खुलासा

Reshma Shinde 'घरोघरी मातीच्या चुली' फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी शेअर केल्या आहेत. तिचा साऊथ इंडियन नवरा पवन तिला एका गोड नावानं हाक मारतो, तर अभिनेत्रीने गूगलवर स्वतःबद्दल शोध घेण्याबाबतही स्पष्ट उत्तर दिलं आहे.
Reshma Shinde

Reshma Shinde मराठी टेलिव्हिजनच्या प्रेक्षकांमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली ही अभिनेत्री सध्या ‘स्टार प्रवाह’वरील लोकप्रिय मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’ मध्ये मुख्य भूमिकेत झळकत आहे. तिच्या अभिनयासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगत असते.

रेश्माने नोव्हेंबर २०२४ मध्ये साऊथ इंडियन पवनशी लग्न केल्यानंतर चाहत्यांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. पवन हा आयटी प्रोफेशनमध्ये कार्यरत असून त्याच्या आणि रेश्माच्या अनेक फोटोंवर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत असतो. नुकत्याच एका मुलाखतीत रेश्माने तिच्या टोपणनावाबद्दल मजेदार खुलासा केला. ती म्हणाली, “मला सोनू, सोंडू, शोन्नम्मा अशी अनेक नावं घरातल्या आणि मित्रपरिवाराकडून मिळतात. पण माझा नवरा मला ‘शोन्नम्मा’ असं म्हणतो. ते त्याच्या साऊथ इंडियन टचमध्ये इतकं गोड वाटतं की मला ते नाव फार आवडतं.”

Reshma Shinde Husband

अभिनेत्रीला विचारण्यात आलं की ती कधी गूगलवर स्वतःबद्दल शोध घेते का? त्यावर ती हसत म्हणाली, “खरं सांगायचं तर मी स्वतःबद्दल कधीच गूगलवर सर्च करत नाही. लोक सोशल मीडियावर टॅग करतात तेव्हा काही गोष्टी समजतात. पण आता नक्की एकदा सर्च करून पाहीन,” असं म्हणत तिने चाहत्यांना हसवलं.

तसेच स्वतःबद्दल गूगलवर असणाऱ्या चुकीच्या माहितीसंदर्भात रेश्मा म्हणाली, “लोक लिहितात की माझं मानधन एवढं आहे, एवढं मोठं घर आहे, एवढं कमवते… मला आश्चर्य वाटतं की हे सगळं त्यांना कसं माहिती होतं? पण ठीक आहे, त्यांच्या तोंडात तूप-साखर, ते माझ्यासाठी चांगलं मॅनिफेस्ट करतायत असं समजते. फक्त या गोष्टींमुळे इतरांना गैरसमज होऊ नयेत एवढीच इच्छा आहे.”

लग्नाच्या अडीच वर्षांनी अभिनेत्री अमृता पवार बनली आई; लेकाच्या बारशात केला नावाचा सुंदर खुलासा!

सध्या रेश्मा शिंदे ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत जानकी या भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या मालिकेत १२ वर्षांपूर्वीच्या फ्लॅशबॅक कथेला सुरुवात झाली असून, जानकी आणि हृषिकेश यांच्या प्रेमकथेचा नवा टप्पा प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. रेश्मा शिंदेची ही मुलाखत तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळीच गोड भेट ठरली आहे—जिथे तिच्या अभिनयाइतकाच तिचा साधेपणा आणि विनोदी स्वभावही अधिक खुलून आला आहे.