Prasad Khandekar ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला आणि आपल्या अप्रतिम अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकलेला अभिनेता प्रसाद खांडेकर सध्या चर्चेत आला आहे. कारण त्याच्या घरी नुकतीच एक खास पाहुणी दाखल झाली आहे – ती म्हणजे त्याची नवीन SUV कार ‘टाटा सफारी’. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रसादने ही गाडी खरेदी केली असून, आपल्या सोशल मीडियावरून त्याने ही आनंदाची बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
आपल्या नव्या गाडीसोबतचा फोटो शेअर करत प्रसादनं लिहिलं आहे, “फायनली माझी ड्रीम कार आयुष्यात आली. कॉलेजपासून टाटा सफारी हीच माझी आवडती गाडी होती. मित्रांची स्वप्नं मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू घेण्याची होती, पण माझं लक्ष्य नेहमी टाटा सफारीवरच होतं.” या पोस्टसोबत त्याने ‘Reclaim your adventure’ असा हॅशटॅग देत टाटा सफारीचं आपल्या कुटुंबात स्वागत केलं आहे.
सफारीबद्दल बोलताना प्रसाद खांडेकरने जुन्या आठवणीही जाग्या केल्या. तो म्हणतो, “त्या काळात प्रत्येक राजकारणी, सेलिब्रिटी किंवा व्हीआयपी व्यक्ती टाटा सफारी किंवा सिएरामध्ये फिरायचे. ती गाडी रस्त्यावरून जाताना एक वेगळाच दिमाख असायचा, आणि आज तोच अनुभव स्वतः घेतोय. आई, अल्पा, श्लोक आणि मी — आम्ही सगळेच या नव्या गाडीमुळे अत्यंत आनंदी आहोत.” Prasad Khandekar New Car
कॉमेडीतून प्रसिद्ध झालेल्या प्रसादने ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि अभिनय दोन्ही केले आहेत. तसेच ‘गाडी नंबर १७६०’ आणि ‘चिकी चिकी बुबूम बुम’ सारख्या चित्रपटांत तो झळकला आहे. सध्या तो ‘थेट तुमच्या घरातून’ या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
अभिनय, दिग्दर्शन आणि विनोद यांचा सुंदर संगम साधणाऱ्या प्रसाद खांडेकरने आपलं कॉलेजचं स्वप्न पूर्ण करत आयुष्यातील एक मोठा टप्पा गाठला आहे. टाटा सफारी ही केवळ एक गाडी नाही, तर त्याच्या मेहनतीचा आणि यशाचा एक प्रतीक आहे.







