Prajakta Koli : मराठी सिनेमसृष्टीत प्रत्येक वेळी नवनवीन प्रयोग सादर करणारा दिग्दर्शक हेमंत ढोमे पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी नवा विषय घेऊन येतो आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘क्रांतीज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ नुकताच चर्चेत आला असून, या सिनेमामध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री Prajakta Koli झळकणार आहे.
नेटफ्लिक्सवरील ‘Mismatched’, हिंदी चित्रपट ‘जुग जुग जिओ’ यांसारख्या प्रकल्पांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेल्या प्राजक्ता कोळीचं मराठीतलं हे पहिलंच पाऊल असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
या सिनेमाच्या पहिल्या पोस्टरनंतर आता दुसरं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं असून, यात अनेक दिग्गज कलाकारांची नावं जाहीर झाली आहेत. अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर यांच्यासोबत अभिनेत्री क्षिती जोग, कादंबरी कदम, तसेच हरीश दुधाडे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असतील. इतकंच नव्हे तर, पोस्टरवर प्राजक्ता कोळीचं नाव पाहताच चाहत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेचा अनपेक्षित शेवट; दीड वर्षांतच बंद, चाहत्यांमध्ये नाराजी
चित्रपटाच्या कथानकाचा केंद्रबिंदू आहे – मराठी शाळांचं कमी होतं जाणारं अस्तित्व आणि मातृभाषेतून होणारी खरी घडण. अलिबाग आणि परिसरात चित्रीकरण पूर्ण झालेलं असून, दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी स्वतःच्या शालेय शिक्षणाच्या आठवणींशी जोडलेला हा प्रवास प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या मते, “मराठी शाळांबाबतचा हा चित्रपट माझ्यासाठी केवळ सिनेमा नसून, एका पिढीच्या संस्कारांचा वारसा आहे.”
चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचं असून, निर्मिती ‘क्षिती जोग चलचित्र मंडळी’ची आहे. हेमंत ढोमेने ‘झिम्मा’, ‘झिम्मा २’ आणि ‘फसक्लास दाभाडे’ सारखे चित्रपट देत प्रेक्षकांचा विश्वास जिंकला आहे. त्यामुळे त्याच्या या नव्या सिनेमाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठ्या अपेक्षा आहेत.
सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: प्राजक्ता कोळीच्या मराठी पदार्पणामुळे चित्रपटाला तरुण प्रेक्षकवर्गाचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातो. आता या सिनेमाची अधिकृत रिलीज डेट जाहीर होण्याचीच प्रेक्षकांना आतुरता लागली आहे.









