Onkar Bhojane Maharashtrachi Hasyajatra entry : मराठी टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी कार्यक्रमांपैकी एक असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांचा आवडता कलाकार ओंकार भोजने परतला आहे. दिवाळीच्या खास मुहूर्तावर होणाऱ्या त्याच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. आपल्या खास विनोदी टायमिंगमुळे घराघरात प्रसिद्ध झालेला हा कलाकार पुन्हा रंगमंचावर दिसणार असल्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
ओंकार भोजने या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक घरात पोहोचला. त्याचे “अगं अगं आई…” आणि “हा इथे काय करतोय?” सारखे डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या ओठांवर आहेत. त्याच्या जोशपूर्ण अभिनयामुळे प्रत्येक स्किट गाजलं आणि त्याने स्वतःचं वेगळं स्थान प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलं. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा तो त्याच जोमात परतला आहे.
‘राजश्री मराठी’शी बोलताना ओंकार भोजने ( Onkar Bhojane ) म्हणाला, “पुन्हा हास्यजत्रेच्या मंचावर परतताना मला प्रचंड उत्सुकता वाटतेय. एकीकडे आनंद आहे, तर दुसरीकडे थोडं दडपणही आहे, कारण मला पुन्हा तीच ऊर्जा आणि जोश घेऊन परफॉर्म करायचं आहे. मी थोडा मागे पडलोय असं वाटतंय, पण आता ती मजा पुन्हा अनुभवण्याची वेळ आली आहे.”
ओंकार पुढे म्हणतो, “मी शोचा भाग नसतानाही प्रेक्षक म्हणून ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नियमित पाहायचो. रात्री ९ वाजता हा शो बघणं माझ्या रोजच्या सवयीचा भाग बनला होता. त्यामुळे आता पुन्हा या मंचावर उभं राहणं माझ्यासाठी एक वेगळाच अनुभव आहे.”
हे पण वाचा.. गोव्याच्या किनारी भावना-सिद्धूच्या प्रेमाचा ‘तो क्षण’; लग्नानंतर पहिली दिवाळी साजरी
सोनी मराठीसारख्या मोठ्या वाहिनीने आणि चाहत्यांनी दिलेल्या ऊबदार स्वागताने ओंकार भारावून गेला आहे. त्याच्या पुनरागमनानंतर शोची रंगत पुन्हा वाढणार हे निश्चित आहे. Onkar Bhojane च्या प्रसिद्ध स्किट्स, त्याची ऊर्जा, आणि ‘साइन, कॉस, थिटा’ सारखे प्रसिद्ध डायलॉग्स पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहेत.ओंकार भोजनेच्या या पुनरागमनामुळे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ पुन्हा एकदा नव्या जोशात सजणार असून, या दिवाळीत हसवणुकीचा दुहेरी डोस प्रेक्षकांना मिळणार आहे
हे पण वाचा.. लग्नाआधी ५ दिवस क्रूजवर अडकले शिवानी-विराजस; प्रपोजचा किस्सा सांगत हसले दोघेही








