nivedita saraf cannes red carpet paithani marathi pride : जगभरात चर्चेत असलेल्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. १२ मेपासून सुरू झालेल्या ७९ व्या कान्स चित्रपट महोत्सवात यंदा मराठी मनोरंजन विश्वाचाही ठसा उमटताना दिसत आहे. विविध देशांतील कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेसृष्टीतील मान्यवरांच्या उपस्थितीत रंगणाऱ्या या प्रतिष्ठित सोहळ्यात मराठी कलाकारांनीही आपली खास ओळख निर्माण केली आहे.
यंदाच्या कान्स महोत्सवासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी आणि अंकिता वालावलकर हे कलाकार फ्रान्समध्ये पोहोचले आहेत. मात्र यामध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या पारंपरिक आणि मराठमोळ्या लूकने विशेष लक्ष वेधून घेतले आहे. रेड कार्पेटवर त्यांनी केलेला सोज्वळ अंदाज सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आला आहे.
निवेदिता सराफ यांनी या खास प्रसंगी फिकट निळ्या आणि जांभळ्या रंगाची आकर्षक पैठणी परिधान केली होती. पारंपरिक मराठी पेहराव आणि जागतिक मंच यांचा सुंदर मिलाफ त्यांच्या लूकमध्ये पाहायला मिळाला. साधेपणा आणि देखणेपणाचा उत्तम समतोल साधणाऱ्या या साडीने अनेकांचे लक्ष वेधले. मात्र त्यांच्या लूकमधील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे त्यांनी घातलेला खास डिझाइनचा ब्लाऊज.
जांभळ्या रंगाच्या या ब्लाऊजच्या पाठीमागे पारंपरिक स्त्रियांची सुंदर चित्रकला साकारण्यात आली होती. विशेष म्हणजे त्या चित्रातील एका महिलेच्या हातात असलेल्या पाटीवर ‘मराठी’ असा शब्द लिहिलेला दिसत होता. जागतिक स्तरावरील इतक्या मोठ्या मंचावर मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान अशा अनोख्या पद्धतीने मांडल्यामुळे नेटकऱ्यांनी निवेदिता सराफ यांचे भरभरून कौतुक केले आहे.
या लूकला अधिक उठावदार बनवण्यासाठी त्यांनी गळ्यात पारंपरिक हार, कानात डूल आणि नाकात मराठमोळी नथ परिधान केली होती. त्यांच्या या संपूर्ण पेहरावामध्ये मराठी संस्कृतीचे सौंदर्य स्पष्टपणे झळकत होते. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या फोटोंमध्ये त्यांचा आत्मविश्वास आणि अभिमान दोन्हीही पाहायला मिळत आहेत.
हे पण वाचा .. अंकिता वालावलकर ठरली कान्स रेड कार्पेटवर जाणारी पहिली मराठी इन्फ्लुएन्सर
nivedita saraf cannes red carpet paithani marathi pride
हे खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करताना निवेदिता सराफ यांनी “परंपरेतलं सौंदर्य जेव्हा जागतिक मंचावर खुलतं… तेव्हा तयार होतो अभिमानाचा क्षण” अशी भावनिक कॅप्शन दिली. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असून अनेकांनी “मराठी संस्कृतीचा अभिमान”, “खऱ्या अर्थाने मराठमोळा कान्स लूक” अशा शब्दांत त्यांचे कौतुक केले आहे.
हे पण वाचा.. नऊवारी साडी आणि नथीत कॅन्स रेड कार्पेटवर प्राजक्ता माळीचा दैदिप्यमान मराठमोळा जलवा
कान्ससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय आणि विशेषतः मराठी संस्कृतीची ओळख अशा पद्धतीने सादर होत असल्यामुळे मराठी प्रेक्षकांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. निवेदिता सराफ यांच्या या खास लूकने पुन्हा एकदा पारंपरिक पैठणीचे सौंदर्य आणि मराठी संस्कृतीचा ठसा जगासमोर अधोरेखित केला आहे.









