‘झी मराठी’वरील लोकप्रिय मालिका ‘नवरी मिळे हिटलरला’ दिवसेंदिवस अधिक रंजक होत चालली आहे. अभिराम जहागीरदार म्हणजेच एजे आणि लीला यांची लव्ह स्टोरी बहरताना दिसत आहे. सतत कठोर स्वभावासाठी ओळखला जाणारा एजे, लीलाच्या गोड स्वभावामुळे हळूहळू तिच्या प्रेमात पडत जातो. आता त्यांचे नातं अधिक घट्ट होत असल्याचं मालिकेत पाहायला मिळत आहे. मात्र, या गोडसाखर संसारात आता मोठा अडथळा येणार आहे.
अलिकडेच मालिकेत एजे आणि लीला हनीमूनसाठी काश्मीरला गेले होते. तिथे घडलेल्या एका घटनेनंतर एजे अधिक पझेसिव्ह बनला आहे. लीलाला गोळी लागल्यानंतर त्याची काळजी अधिकच वाढली आहे. काश्मीरहून परतल्यानंतर एजेने लीलाच्या करिअरसाठी तिला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी लीला फोटोशूट करते, मात्र तिच्या तीन सासवा त्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. तरीही लीलाने आपला निश्चय कायम ठेवत एजेच्या पाठिंब्याने पुढे जाण्याचा निर्णय घेतला.
मात्र, आता या सुखद वातावरणात एक मोठा ट्विस्ट येणार आहे. प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरलेल्या या ट्विस्टमध्ये एजेच्या पहिल्या पत्नीचा पुनरागमन होणार आहे. काही वर्षांपूर्वी निधन झालेली एजेची पहिली पत्नी, अंतरा जहागीरदार पुन्हा घरात परत येणार आहे. या अनपेक्षित घटनेमुळे एजे आणि लीला मोठ्या संकटात सापडणार आहेत. अंतरा परत आल्याचं पाहून दोघांनाही मोठा धक्का बसतो. कारण अंतराचा मृत्यू अनेक वर्षांपूर्वी झाल्याचं दाखवण्यात आलं होतं आणि त्यानंतरच एजेने आईच्या इच्छेखातर लीलाशी विवाह केला होता.
एजे आणि लीला आता एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना अंतराच्या आगमनाने त्यांच्यात दुरावा निर्माण होणार का? की एजे आपल्या सध्याच्या पत्नीची साथ देण्याचा निर्णय घेईल? हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला आहे.
याशिवाय अंतराच्या पुनरागमनामागचं रहस्य काय आहे? तिच्या मृत्यूचं नेमकं गूढ काय आहे? यासंदर्भात येत्या भागांमध्ये थरारक खुलासे पाहायला मिळतील. या ट्विस्टमुळे मालिका अधिक उत्कंठावर्धक होणार आहे.
मालिकेत अंतराची भूमिका अभिनेत्री माधुरी भारती साकारत असून, तिच्या प्रवेशानंतर कथानकाला वेगळीच दिशा मिळणार आहे. या नव्या ट्विस्टनंतर एजे-लीलाच्या नात्याचं भवितव्य काय ठरेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’च्या प्रेक्षकांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती म्हणजे, १७ मार्चपासून ही मालिका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता ही मालिका रात्री ११ वाजता प्रेक्षक पाहू शकतील. मालिकेतील हा धक्कादायक ट्विस्ट आणि अंतराच्या आगमनानंतरचा पुढील प्रवास पाहण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.