वैष्णवी हगवणे प्रकरणावर नाना पाटेकर यांची थेट प्रतिक्रिया Nana Patekar Vaishnavi Hagwane Case

Nana Patekar on Vaishnavi Hagwane Case

Vaishnavi Hagwane Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरलं असताना, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी हुंडा प्रथेविरोधात ठाम भूमिका घेतली आहे. समाजातील विसंगतीवर त्यांनी रोखठोक भाष्य करत लग्नात अनाठायी खर्चाऐवजी मुलांच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.

पुण्यातील वैष्णवी हगवणे या तरुणीच्या आत्महत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. लग्नानंतर अविरत मानसिक छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने समाजात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी सासरच्या कुटुंबीयांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी हुंडा प्रथेबद्दल आणि लग्नाच्या अनाठायी खर्चाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

नाना पाटेकर म्हणाले, “हुंडाबळी ही एक विकृत वृत्ती आहे. ज्या लोकांमुळे अशी प्रकरणं घडतात, त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. मात्र या मागे असणाऱ्या सामाजिक मानसिकतेचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.” त्यांच्या मते, लग्नावर होणारा मोठ्या प्रमाणात खर्च ही सामाजिक प्रतिष्ठेची एक चुकीची व्याख्या बनली आहे. ( Vaishnavi Hagwane Case )


“माझ्या वैयक्तिक मताने, मी लग्नात लाखो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा तो पैसा वृद्धाश्रम, अनाथाश्रम किंवा मुलांच्या शिक्षणासाठी वापरतो,” असे म्हणत नाना पाटेकर यांनी समाजाला एक वेगळा विचार दिला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, लग्न हा प्रत्येकाचा वैयक्तिक निर्णय आहे, पण त्यामध्ये दौलतजादा करून दुसऱ्यांवर अपेक्षा लादणं चुकीचं आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर समाजातील काही कटू वास्तव पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. ५१ तोळे सोनं, फॉर्च्युनर गाडी, चांदीची भांडी अशा अनेक गोष्टी लग्नात दिल्यानंतरही वैष्णवीला त्रास सहन करावा लागल्याचे तिच्या कुटुंबियांनी सांगितले. यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की, इतकं सर्व काही दिलं तरी मुलीला स्वीकारलं जात नाही, तर मग ही प्रथा कधी थांबणार?

नाना पाटेकर यांचे यावर मत स्पष्ट आहे. “दौलतजादा करणारी, व्यसनाधीन माणसं हे समाजाचाच भाग आहेत. अशा लोकांचं अस्तित्व नाकारता येत नाही. पण म्हणून आपण सारेच तसे आहोत असंही म्हणता येणार नाही,” असं ते म्हणाले.

अभिनेत्री प्राची पिसाटला अभिनेत्याचा आक्षेपार्ह मेसेज; सोशल मीडियावर संतापाचा भडका Prachi Pisat Sudesh Mhashilkar

सामाजिक जबाबदारीबाबत बोलताना ते म्हणाले, “आम्ही कलाकार म्हणून फक्त करमणूकच करत नाही, तर समाजातील विसंगतीसुद्धा समोर आणतो. झाडावर रोग येतो म्हणून झाडेच लावायची नाहीत का? फळे खायची नाहीत का? प्रत्येक क्षेत्रात काही ना काही विसंगती असते, त्यामुळे त्यावर उपाय शोधणं महत्त्वाचं आहे.”

त्यांनी सध्याच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक समस्यांवर देखील लक्ष वेधलं. अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे मुलांचं शिक्षण थांबतं आहे, असं ते म्हणाले. “खेड्यांत पावसाळ्यात मुलांना शाळा गाठणं कठीण होतं. त्यामुळे नाम फाउंडेशनच्या माध्यमातून शाळा आणि वसतिगृहं सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे,” अशी माहिती त्यांनी दिली. ( Vaishnavi Hagwane Case )

दरम्यान, वैष्णवीच्या आत्महत्येनंतर तिच्या सासरच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चौकशी सुरू आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे एक स्थानिक पदाधिकारी अडचणीत आले असून त्यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. सोशल मीडियावर वैष्णवीचे फोटो, व्हिडीओ आणि तिच्या शेवटच्या क्षणांतील आठवणींचा ओघ सुरू आहे. हजारो लोक तिच्या न्यायासाठी आवाज उठवत आहेत.

या प्रकरणानंतर नाना पाटेकर ( Nana Patekar ) यांचे वक्तव्य अधिक महत्त्वाचं ठरतं. कारण ते केवळ प्रतिक्रिया नाही, तर समाजाला विचार करायला लावणारा आरसा आहे. लग्नसारख्या आनंदाच्या प्रसंगालाही जर विकृतीचं स्वरूप येत असेल, तर आपण समाज म्हणून कुठे चाललो आहोत, हा प्रश्न सर्वांनी स्वतःला विचारायला हवा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *