Mrunmayee Deshpande : मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. लवकरच ती ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची विशेष बाब म्हणजे मृण्मयी केवळ मुख्य भूमिकेतच नाही तर या चित्रपटाची लेखिका आणि दिग्दर्शकही आहे. तिच्या या बहुआयामी प्रयत्नामुळे सिनेसृष्टीत तिचं कौतुक होत आहे.
सध्या मृण्मयी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अलीकडेच तिने लोकशाही फ्रेंडली या YouTube चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत अनेक रोचक गोष्टी शेअर केल्या. या दरम्यान तिला विचारण्यात आलं की, ती पुन्हा एकदा टेलिव्हिजन मालिकांमध्ये दिसणार का? यावर अभिनेत्रीने मनमोकळं उत्तर दिलं. ती म्हणाली, “मला मालिकांमध्ये काम करायला नेहमीच आवडतं. अनेकदा ऑफर्स येतातदेखील, पण सध्या मी सलग तीन ते चार महिन्यांचीच कमिटमेंट देऊ शकते. त्यामुळे एखादा मर्यादित कालावधीचा प्रोजेक्ट असेल तर नक्कीच मी करेन.”
मृण्मयीने ( Mrunmayee Deshpande ) पुढे सांगितलं की, तिचं आयुष्य फक्त अभिनय आणि दिग्दर्शनापुरतं मर्यादित नाही. “महाबळेश्वरमध्ये आमचं शेत आहे आणि ‘नील अँड मोमो’ नावाची आमची स्वतःची कंपनी आहे. मला निसर्गात वेळ घालवायला आवडतं. निसर्ग खूप काही शिकवतो, वाढवतो आणि समतोल राखायला शिकवतो,” असं ती म्हणाली.
अभिनेत्रीच्या मते, “मनाचे श्लोक” हा चित्रपट केवळ कथा सांगत नाही, तर जीवनातील समतोल, निसर्गाशी जोडलेलं नातं आणि आत्मचिंतन यांचा अनुभव देतो. दरम्यान, मृण्मयीची बहीण गौतमी देशपांडे हिनेदेखील मालिकांमध्ये परतण्याबाबत आपलं मत व्यक्त केलं. ती म्हणाली, “ताईसारखंच मलाही मालिकांमध्ये पुन्हा काम करायला आवडेल. पण सध्या नाटक आणि इतर प्रोजेक्ट्समुळे वेळ देणं कठीण होतं. मालिका हे माध्यम रोजचे १४ तास मागतं, त्यामुळे कमिटमेंटची मोठी जबाबदारी असते.”
दोन्ही बहिणींनी स्पष्ट केलं की, अभिनयाविषयीचं प्रेम कायम आहे, पण सध्या त्या स्वतःच्या कलात्मक प्रवासात आणि निसर्गाशी असलेल्या नात्यात रमल्या आहेत. त्यामुळे चाहत्यांना त्यांच्या पुढील प्रोजेक्ट्सची उत्सुकता लागली आहे.









