mohan joshi swami samarth look deul band 2 pravin tarde story : प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘देऊळ बंद २’ हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मोठ्या चर्चेत आहे. अध्यात्म, श्रद्धा आणि समाजातील वास्तव यांची सांगड घालणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. २१ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटातील श्री स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी साकारलेला अभिनय सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात कौतुकाचा विषय ठरत आहे.
‘देऊळ बंद २’ मध्ये केवळ अध्यात्मिक बाजू दाखवण्यात आलेली नाही, तर शेतकरी आत्महत्या यांसारख्या गंभीर सामाजिक विषयालाही स्पर्श करण्यात आला आहे. त्यामुळे हा चित्रपट फक्त भक्तीभाव मांडणारा न राहता समाजाला विचार करायला लावणारा सिनेमा ठरला आहे. पहिल्या भागाप्रमाणेच दुसऱ्या भागातही स्वामी समर्थांच्या भूमिकेसाठी मोहन जोशी यांची निवड करण्यात आली आणि त्यांच्या सादरीकरणाने प्रेक्षक अक्षरशः भारावून गेले आहेत.
अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान प्रवीण तरडेंनी या भूमिकेसाठी मोहन जोशी यांची निवड कशी झाली यामागचा रंजक किस्सा सांगितला. स्वामी समर्थांची व्यक्तिरेखा पडद्यावर उभी करताना केवळ चेहरा साधर्म्य असलेला कलाकार नको होता, तर त्या भूमिकेचं वजन समर्थपणे पेलू शकेल असा अनुभवी अभिनेता हवा होता, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी लेखक आणि संगीतकार प्रणीत कुलकर्णी यांनी मोहन जोशी यांचं नाव सुचवलं.
मात्र, मोहन जोशी यांच्या शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाबद्दल इंडस्ट्रीत मोठी चर्चा असल्याने त्यांच्याशी या विषयावर बोलताना स्वतःला भीती वाटत होती, अशी कबुलीही प्रवीण तरडेंनी दिली. अखेर धीर करून ते आणि प्रणीत कुलकर्णी मोहन जोशी यांना भेटायला गेले. त्या भेटीत त्यांनी चित्रपटाची कथा आणि स्वामी समर्थांच्या भूमिकेची संकल्पना सविस्तरपणे सांगितली.
कथा ऐकल्यानंतर मोहन जोशी यांनी सर्वात आधी एकच प्रश्न विचारला होता – “मी स्वामी समर्थांसारखा दिसेन का?” हा प्रश्न ऐकून संपूर्ण टीमने त्यांची मेकअप ट्रायल करण्याचा निर्णय घेतला. मेकअप पूर्ण झाल्यानंतर मोहन जोशी यांनी जेव्हा आरशात स्वतःकडे पाहिलं, तेव्हा काही क्षण ते स्वतःही अवाक झाले होते. त्या लूकमध्ये त्यांना स्वामी समर्थांची छबी स्पष्ट जाणवली आणि त्याच क्षणी त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला.
हे पण वाचा.. देऊळ बंद २ ची बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई; ७ दिवसांत २८ कोटी पार, प्रवीण तरडे आनंदात
mohan joshi swami samarth look deul band 2 pravin tarde story
आज ‘देऊळ बंद २’ पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षक मोहन जोशी यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक करत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील शांतता, संवादफेक आणि देहबोलीमुळे पडद्यावर स्वामी समर्थ जिवंत झाल्याची भावना प्रेक्षक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या भूमिकेमुळे मोहन जोशी यांच्या कारकिर्दीत आणखी एक लक्षवेधी अध्याय जोडला गेला आहे.
हे पण वाचा.. देऊळ बंद २च्या यशानंतर स्नेहल तरडेंची भावनिक पोस्ट चर्चेत स्वामी समर्थांच्या कृपेचा केला उल्लेख









