marathi industry grupism chetan vadnere mat : मराठी सिनेइंडस्ट्री आणि मालिकांमध्ये काम मिळवणं हे कित्येक कलाकारांचं स्वप्न असतं. पण या प्रवासात अनेकदा ‘ग्रुपिझम’ आणि ‘ओळखीची मंडळी’ यामुळे संधी मिळण्यात अडथळे निर्माण होतात. नुकताच टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता Chetan Vadnere याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत या वास्तवावर थेट भाष्य केलं आहे.
“हो… इंडस्ट्रीत गटबाजी आहे. पण मी जर त्यांच्या ग्रुपमध्ये गेलो, तर कोणी मला हटकणार नाही. मात्र त्यासाठी स्वतःहूनच त्या गटाचा भाग व्हावं लागतं. आपल्याकडे हिंदीसारखी कास्टिंग एजन्सी किंवा कास्टिंग डायरेक्टरची पद्धत नाही. इथे बहुतांश वेळा निर्माता किंवा दिग्दर्शक आपल्या ओळखीतील चार-पाच जणांना घेऊन चित्रपट काढतो. त्यामुळे अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणं कठीण होतं,” असं Chetan Vadnere म्हणाला.
त्याने पुढे स्पष्ट केलं की, हिंदी इंडस्ट्रीत कास्टिंग हब किंवा कास्टिंग डायरेक्टर असतात, ज्यांच्याकडे कलाकार आपलं पोर्टफोलिओ देऊ शकतात. त्यातून दिग्दर्शकांना नव्या कलाकारांची माहिती मिळते. मात्र मराठीत अशी साखळीच नाही. परिणामी, मर्यादित मंडळींनाच संधी मिळते आणि बाकीच्यांना सतत संघर्ष करावा लागतो.
“मला काही दिग्दर्शकांबरोबर काम करायचं आहे. पण थेट त्यांच्याकडे काम मागायला न जाता, मी आधी स्वतःची चांगली कामं सादर करू इच्छितो. त्यांना हे दाखवायचं आहे की मी काहीतरी ठोस केलं आहे. त्यामुळेच आतापर्यंत मी अनेकांना संपर्क केलेला नाही. पण पुढच्या काळात नक्की प्रयत्न करेन,” असंही त्याने नमूद केलं.
हे पण वाचा.. ‘लपंडाव मालिकेचा पहिला भाग : रुपाली भोसलेची दमदार एंट्री, पहिल्याच भागाने प्रेक्षकांची मने जिंकली
चेतन वडनेरे यापूर्वी काही लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. आता तो ‘लपंडाव’ या नव्या मालिकेत झळकतो आहे, ज्यात कृतिका देशमुख आणि रुपाली भोसले यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे त्याच्या या नव्या भूमिकेकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल चेतननं व्यक्त केलेलं हे स्पष्ट मत पुन्हा एकदा चर्चेत आलं असून, नवोदित कलाकारांसाठीही त्याच्या या विचारांतून वास्तवाची झलक दिसते.
हे पण वाचा.. मालिकांमधील एकसारख्या भूमिका नाकारल्या; ‘लपंडाव’ मालिकेबद्दल चेतन वडनेरेची स्पष्ट भूमिका









