Lakshmi Nivas Jahnavi New Look ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका नेहमीच अनपेक्षित ट्विस्ट आणि उत्कंठावर्धक प्रसंगांमुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सध्या मालिकेत सुरू असलेल्या कथानकात जान्हवीचा मृत्यू झाल्याचं भासवण्यात आलं होतं. जयंतच्या त्रासाने कंटाळून तिने पाण्यात उडी मारली आणि ती कायमची हरवली, असं दाखवलं गेलं. जयंतचे प्रयत्न, लक्ष्मीचं दु:ख आणि कुटुंबातील भावनिक उलथापालथ पाहून प्रेक्षक भारावून गेले होते. मात्र, या सगळ्या घडामोडींनंतर आता मालिकेत असा ट्विस्ट आला आहे की सगळ्यांच्या नजरा स्क्रीनवर खिळल्या आहेत.
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये जान्हवीचं पुनरागमन दाखवण्यात आलं आहे — पण यावेळी ती ‘तनुजा’ या नावाने परतली आहे. पाण्यात उडी घेतल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेत सापडते आणि तिचं प्राण वाचवणारे दुसरे कोणी नसून विश्वाचे वडील दिग्विजय देशमुख आहेत. ती गाडीत लपून बसते आणि दिग्विजय यांचं जीवन वाचवते, त्यामुळे ते तिला आपल्या घरी घेऊन जातात. पत्नीसमोर ते जान्हवीची ओळख ‘तनुजा’ म्हणून करून देतात.
‘Lakshmi Nivas Jahnavi New Look’ या प्रोमोमध्ये जान्हवीचं पूर्णतः बदललेलं रूप पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. तिचं नवं नाव, नवी ओळख आणि गूढ शांतता यामागे नेमकं काय दडलं आहे, हा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. दळवी कुटुंबीयांना ती पुन्हा कधी आणि कशी सापडणार? विश्वा आणि जान्हवीची पुन्हा भेट झाल्यावर काय घडेल? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.
३० ऑक्टोबरच्या भागात जान्हवीच्या रिएन्ट्रीचा विशेष एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या प्रोमोवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या — “खतरनाक ट्विस्ट!”, “जानू परत आली म्हणजे धमाका होणार!”, “स्मृती गेलीये असं वाटतंय” अशा कमेंट्सने सोशल मीडियावर अक्षरशः पाऊस पडला आहे.
‘लक्ष्मी निवास’च्या या नव्या वळणामुळे मालिकेची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जान्हवी उर्फ तनुजाचं हे रूप प्रेक्षकांसाठी पुढील काही भागांमध्ये कोणते धक्कादायक प्रसंग घेऊन येतंय, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.









