Lakshmi Nivas : ‘लक्ष्मी निवास’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या भावनांचा प्रचंड कल्लोळ सुरू आहे. जान्हवी, लक्ष्मी, जयंत, भावना, सिद्धू आणि वीणा यांच्या आयुष्यात एकामागून एक घडणाऱ्या घटनांमुळे कथा अधिकच रोचक बनली आहे. प्रेक्षक दररोज नवीन ट्विस्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत, आणि आता मालिकेत पुन्हा एक धक्कादायक वळण येणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
जयंतच्या विकृत स्वभावाचा आणि आजीवर त्याने केलेल्या अत्याचाराचा उलगडा झाल्यानंतर जान्हवीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. त्याच्यापासून दूर जाण्यासाठी तिने गोव्यात समुद्रात उडी मारण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेनंतर जयंतने पोलिसांच्या मदतीने तिचा शोध घेतला, मात्र ती सापडली नाही. त्यामुळे त्याने जान्हवीचा मृत्यू झाल्याचे तिच्या कुटुंबाला सांगितले. या बातमीने दळवी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आणि हळूहळू त्यांनी हे वास्तव स्वीकारले.
मात्र सत्य काही वेगळंच होतं. जान्हवी समुद्राच्या किनाऱ्यावर जिवंत आढळली आणि तिची भेट विश्वाच्या वडिलांशी झाली. त्यांनी केलेल्या अपघातापासून त्यांना वाचवून जान्हवीने स्वतःचं नाव ‘तनुजा’ असं सांगितलं आणि खरी ओळख लपवली. जयंतकडे परत जाण्याची भीती असल्यामुळे ती सध्या विश्वाच्या घरी राहते आहे. तरीदेखील, विश्वा आणि जान्हवीची अजून थेट भेट झालेली नाही.
अलीकडेच झी मराठीने ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता वाढली आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी चेहरा झाकून तिच्या घरात परतताना दिसते. दारातून तिला स्वतःचा फोटो हारासह दिसतो आणि ती घरात शिरून आजीच्या खोलीत जाते. आजी कोमात असून जान्हवी तिच्या जवळ बसून भावनिक स्वरात म्हणते, “ए आजी, त्या जयंतने तुझी जी अवस्था केली त्यासाठी मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही.”
दरम्यान, लक्ष्मीला देखील जान्हवी आजूबाजूला असल्याचे भास होतात. ती “जानू” अशी हाक मारते, आणि स्वतःशीच म्हणते, “मला भास का होत आहेत?” असे म्हणताना तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसतात. झी मराठीने या व्हिडिओसोबत “माय-लेकीची भेट अखेर होईल का?” असा कॅप्शन देत चाहत्यांना विचारात टाकले आहे. आता जान्हवी व लक्ष्मीची भेट होणार का? दळवी कुटुंबाला ती जिवंत असल्याचं समजणार का? ‘लक्ष्मी निवास’च्या पुढील भागात हे रहस्य उलगडणार असून, प्रेक्षक उत्सुकतेने या भावनिक क्षणांची वाट पाहत आहेत.
लोकप्रिय मराठी कपल मधुरा जोशी आणि गुरु दिवेकर यांनी खरेदी केली पहिली कार









