छोट्या पडद्यावरचा सर्वात चर्चेत असलेला शो म्हणजे ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’. या मालिकेमुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा स्मृती इराणींचं दमदार पुनरागमन पाहायला मिळालं. अनेक वर्षांनंतर त्या पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेत झळकल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. एकता कपूरच्या बॅनरखाली बनलेली ही मालिका २९ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित झाली होती आणि त्यानंतर अल्पावधीतच तिला चांगला प्रतिसादही मिळाला.
मात्र, आता या मालिकेबद्दल नवी चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ बंद होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. फक्त तीन महिन्यांत मालिकेचा प्रवास संपणार असल्याची माहिती समोर आल्यानं प्रेक्षकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या अफवांवर नुकतंच मालिकेतील अभिनेता हितेन तेजवानीनं भाष्य केलं आहे.
हितेन तेजवानी सध्या या मालिकेत करणची भूमिका साकारत आहे. तो पहिल्या पर्वाचाही भाग होता, त्यामुळे त्याच्याकडून चाहत्यांना खात्रीलायक उत्तराची अपेक्षा होती. ‘इंडिया फोरम्स’ला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, “मला खरंच या चर्चेबद्दल काहीच माहिती नाही. मी मालिकेचं नियमित शूटिंग करत नाही. काही निवडक दिवसांनाच माझं काम असतं. मी सध्या यूएसमध्ये असल्यामुळे काय निर्णय झाला आहे याबद्दल मला ठोस माहिती नाही.”
त्याने पुढे सांगितलं, “जेव्हा मला या मालिकेसाठी संपर्क साधण्यात आला, तेव्हाच सांगण्यात आलं होतं की ही मालिका पहिल्या पर्वासारखी दीर्घकाळ चालणार नाही. ठराविक कालावधीपुरतीच कथा ठेवली जाणार आहे. त्यामुळे चॅनल किंवा निर्मात्यांनी काय ठरवलं आहे, हे सांगणं कठीण आहे.”
या वक्तव्यावरून असं दिसतं की मालिकेबद्दल अद्याप अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही. मात्र, जर मालिकेचा प्रवास इतक्या लवकर संपला, तर स्मृती इराणींच्या चाहत्यांसाठी ती निश्चितच निराशाजनक बातमी ठरेल. ‘Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2’ ही मालिका केवळ नॉस्टॅल्जिकच नव्हे तर भारतीय टेलिव्हिजनवरील एक मोठं कमबॅक प्रोजेक्ट म्हणूनही ओळखली जाते. त्यामुळे या चर्चांवर अधिकृत स्पष्टीकरण येईपर्यंत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता कायम राहणार आहे.









