kamali hrishi nayantara kamali ghar navin twist : ‘कमळी’ या झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत सध्या भावनिक घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक भागात नवे संघर्ष आणि अनपेक्षित वळणं पाहायला मिळत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता कायम आहे. आता आगामी भागात कमळीच्या आयुष्यात आणखी एक मोठं संकट उभं राहणार असून, तिच्या मदतीसाठी हृषी घेतलेला निर्णय कथानकाला महत्त्वाचं वळण देणार आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण अपघातानंतर कमळीची आई गौरी जिवंत असल्याचं समोर आलं होतं. मात्र या अपघातामुळे तिला गंभीर मानसिक धक्का बसला असून तिची स्मरणशक्तीही कमी झाली आहे. तिला तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी आठवत नाहीत. विशेष म्हणजे, स्वतःच्या मुलीला ती ओळखू शकत नसली तरी कमळीच्या लहानपणीच्या काही आठवणी तिच्या मनात अजूनही जिवंत आहेत. त्यामुळे तिची काळजी घेण्याची संपूर्ण जबाबदारी कमळीवर येते.
कमळी आपल्या आईची मनापासून सेवा करत असताना हृषी आणि निंगी तिच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे दिसते. मात्र कमळीच्या आयुष्यात पुन्हा अडथळे निर्माण करण्यासाठी अनिका नवा डाव आखते. मुलींच्या हॉस्टेलमध्ये बाहेरील व्यक्तींना राहण्याची परवानगी नसल्याचा नियम पुढे करत ती प्रशासनाकडे तक्रार करते. परिणामी कमळीने हॉस्टेलचे नियम मोडल्याचे कारण देत तिला खोली रिकामी करण्यास सांगितले जाते.
मुंबईत कमळीचे दुसरे कोणतेही ठिकाण नसल्याने तिच्यासमोर मोठा प्रश्न निर्माण होतो. आई आणि निंगीसोबत आता कुठे राहायचे, हा विचार तिला सतावू लागतो. अनिकाला वाटते की या परिस्थितीत कमळीला गावाकडे परतावे लागेल. मात्र हृषी हा प्रश्न वेगळ्याच पद्धतीने सोडवण्याचा निर्णय घेतो.
आगामी भागात हृषी कमळी, तिची आई आणि निंगीला थेट स्वतःच्या घरी घेऊन जातो. मात्र त्यांना पाहताच नयनतारा आश्चर्यचकित होते. हृषीने फक्त स्वतः घरी येईल, अशी तिची अपेक्षा असते. यावेळी हृषी आईसमोर ठाम भूमिका घेत कमळी आणि तिच्या आईला काही दिवस घरात आश्रय देण्याची विनंती करतो. एवढेच नाही, तर हा निर्णय स्वीकारला नाही तर स्वतःलाही त्या घरात राहणे कठीण होईल, असे स्पष्ट शब्दांत सांगतो.
हे पण वाचा.. ठरलं तर मग मध्ये धक्कादायक कट! प्रियासोबत नागराजही बाहेर, सायली-अर्जुनला अडकवण्यासाठी रचला नवा डाव
हृषीच्या या भूमिकेनंतर नयनतारा काय निर्णय घेणार, कमळीला घरात राहण्याची परवानगी मिळणार का आणि गौरीची हरवलेली स्मृती पुन्हा परत येणार का, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आगामी भागांमध्ये मिळणार आहेत.
दरम्यान, ‘कमळी’ मालिकेचा विशेष भाग २३ जुलै रोजी झी मराठीवर प्रसारित होणार आहे. कमळी पुन्हा एकदा आपल्या स्वभावाने नयनताराचं मन जिंकते का आणि तिच्या आयुष्यातील संकटांवर मात करते का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा ..Video: सनई चौघडे मध्ये जय-शर्वरीच्या नात्याला नवं वळण; पार्टीतील रोमँटिक क्षणांनी जिंकली प्रेक्षकांची मनं









