७१ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याने यंदा अनेक कलाकारांना नवी ओळख मिळवून दिली, त्यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती अवघ्या सहा वर्षांची बालकलाकार त्रिशा ठोसर. ‘नाळ २’मधील तिच्या चिमी या गोड भूमिकेने प्रेक्षकांना मोहून टाकलं. या भूमिकेसाठी तिला मिळालेला राष्ट्रीय पुरस्कार म्हणजे तिच्या कारकिर्दीतील सुरुवातीपासूनच मिळालेली एक मोठी झेप आहे.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंचावर पोहोचलेली त्रिशा ठोसर पारंपरिक साडी नेसून अवखळपणे चालत गेली आणि तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास सगळ्यांना थक्क करून गेला. इतक्या लहान वयात मिळालेल्या या गौरवाने प्रेक्षकांसह अनेक दिग्गज कलाकारही भारावले. या कार्यक्रमानंतर त्रिशाने शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मॅसी, मोहनलाल यांसारख्या दिग्गजांना भेटून शुभेच्छा स्वीकारल्या.
स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकांची जोरदार एंट्री; ‘नशीबवान’ ठरली स्लॉट लीडर, ‘लपंडाव’नेही मारली दमदार झेप
मात्र या सर्व गडबडीत तिच्यासाठी आणखी एक मोठं आश्चर्य तिच्या वाट्याला आलं. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील महानायक आणि सुपरस्टार कमल हासन यांनी त्रिशाला थेट Video Call करून तिचं कौतुक केलं. या संभाषणादरम्यान कमल हासन यांनी तिच्या अभिनयाबद्दल तिला शुभेच्छा देतानाच तिच्या आईलादेखील एक महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी सांगितलं की, “लहान वयात प्रसिद्धी मिळणं हे कौतुकास्पद आहे, पण याच काळात मुलांना साधेपणा, शिस्त आणि शिक्षणाची जाणीव ठेवणं अधिक गरजेचं आहे. तुमची मुलगी पुढे मोठ्या उंचीवर पोहोचू शकते, फक्त तिचं बालपण हरवू देऊ नका.”
हा सल्ला ऐकून त्रिशाच्या आई-वडिलांच्याही डोळ्यात पाणी आलं. त्यांनी सोशल मीडियावरून कमल हासन यांचे आभार मानले आणि ‘नाळ २’च्या दिग्दर्शक, संपूर्ण टीम तसेच रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त केले.
त्रिशा ठोसर हिचं हे यश अचानक मिळालेलं नाही. ‘नाळ’ आणि ‘नाळ २’ या चित्रपटांमध्ये तिने केलेल्या प्रभावी अभिनयाने ती रसिकांच्या मनात कायमची घर करून बसली आहे. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षक तिला स्वतःच्या घरातली मुलगी असल्यासारखं जवळ मानतात. राष्ट्रीय पुरस्कारामुळे तिला मिळालेलं हे यश तिच्या आयुष्याचं सोनेरी पान ठरेल, यात शंका नाही.









