स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन्ही मालिकांचे कथानक सध्या उत्कंठावर्धक वळणावर पोहोचले आहे. या दोन्ही मालिकांचे भाग आता एकत्र दाखवले जात असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सध्या मालिकेच्या कथानकात जानकी आणि सायलीचे बालपण मधुभाऊंच्या आश्रमात एकत्र गेले असल्याचे दाखवण्यात आले आहे. पुढे मधुभाऊंना महिपतपासून वाचवण्याची जबाबदारी सायलीने जानकीवर सोपवली आहे. त्याचवेळी जानकीच्या सासऱ्यांचे अपहरण करण्यासाठी ‘ठरलं तर मग’ मालिकेतील खलनायक महिपतने ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील सयाजीला मदतीस बोलावल्याचे समोर आले आहे.
आगामी भागांमध्ये जानकी आणि हृषिकेश नानांचा शोध घेताना दिसणार आहेत. त्याचवेळी अर्जुन आणि सायली महिपतपासून मधुभाऊंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नशील असतील. याशिवाय, आश्रम मर्डर केसमधील पुरावे मिळवण्याची धडपड देखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जरी मालिकेच्या कथानकात अशी गंभीर वळणे पाहायला मिळत असली तरी ऑफस्क्रिन मात्र कलाकारांचा मजामस्तीचा मूड कायम दिसून येतो. नुकताच अभिनेत्री जुई गडकरीने (मालिकेतील सायली) सेटवरचा एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत जुईचा वेगळ्या अंदाजातील लूक पाहायला मिळतोय, जो चाहत्यांना विशेष आकर्षित करतोय.
या नव्या लूकबद्दल सांगायचे तर, अर्जुन आणि सायलीला आश्रम मर्डर केसमधील पुरावे मिळवण्यासाठी एका बुटीकमध्ये वेशांतर करावे लागणार आहे. त्या सीनसाठी सायलीचा हा हटके लूक तयार करण्यात आला होता. जुईने या सीनसाठी वन पीस ड्रेस, स्टायलिश गॉगल्स आणि बॅन्ग्ज कटसह नवा हेअरस्टाईल केला होता.
मात्र, हा सीन अखेर मालिकेतून वगळण्यात आला. त्यामुळे या खास लूकचा उपयोग न झाल्याने जुईने चाहत्यांसाठी एक मजेशीर व्हिडिओ शेअर करण्याचा निर्णय घेतला. व्हिडिओत जुई गडकरी ‘गोमूचा नाच’ करताना दिसतेय.
कोकणातील पारंपरिक शिमगोत्सवाची धूम सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. गावोगावी वाड्यावाड्यांमध्ये गोमूचा नाच रंगताना दिसतोय. हाच आनंद आपल्या खास अंदाजात साजरा करत जुई गडकरीने गोमूचा नाच करताना मजेशीर व्हिडिओ शेअर केला.
हा व्हिडिओ पोस्ट करताना जुईने गंमतीशीर कॅप्शन दिली आहे — “जेव्हा काही दृश्यांसाठी खास लूक करतो आणि तो सीन रद्द होतो… मग करायचं काय? तर गोमूचा नाच!”
जुईने या पोस्टसाठी #shimga, #konkan, #gomudance, #gomu असे हॅशटॅग वापरत शिमगोत्सवाचा खास माहोल सोशल मीडियावर उभा केला आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेत सोज्वळ आणि शांत स्वभावाची भूमिका साकारणाऱ्या सायलीचा हा धम्माल अंदाज पाहून चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडिओला कमेंट्सद्वारे दाद दिली आहे, तर काही फॅनपेजवरुन देखील हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
जुई गडकरीचा हा हटके अंदाज पाहून चाहते खुश झाले असून तिच्या ऑफस्क्रिन धमाल-मस्तीने प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे. शिमगोत्सवानिमित्त हा खास अंदाज प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरला आहे.