Gharo Ghari Matichya Chuli मराठी चित्रपटसृष्टीतील अनुभवी अभिनेत्री सविता प्रभुणे ( Savita Prabhune ) या सध्या लोकप्रिय मालिकेत ‘घरोघरी मातीच्या चुली’ या मालिकेत झळकत आहेत. त्यांच्या भूमिकेला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, त्यांच्या अभिनयाचं पुन्हा एकदा कौतुक होत आहे. अनेक दशकांपासून मराठी चित्रपट, नाटकं आणि हिंदी मालिकांमधून त्यांनी आपली स्वतंत्र छाप उमटवली आहे. त्यांच्या ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतील सुलोचना या भूमिकेनं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं.
नुकतीच दिलेल्या एका मुलाखतीत सविता प्रभुणे यांनी टेलिव्हिजन इंडस्ट्री, OTT प्लॅटफॉर्म आणि मनोरंजन क्षेत्रातील बदलत्या प्रवाहाबद्दल मोकळेपणाने मत व्यक्त केलं. अमोल परचुरे यांच्या यूट्यूब चॅनेलवर झालेल्या या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आलं की, OTTच्या युगात टेलिव्हिजनचं भविष्य धोक्यात आलं आहे का? यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, “मी अजूनही रोज वर्तमानपत्र वाचते. नाटकांच्या जाहिराती पाहून मला आनंद होतो, कारण आजही प्रेक्षकांना वेगवेगळ्या प्रकारचं मनोरंजन पाहायला मिळतंय. मला वाटतं, हा मराठी प्रेक्षक आणि कलाकार दोघांसाठीही अत्यंत चांगला काळ आहे.”
त्या पुढे म्हणाल्या, “सध्या इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीनं काम सुरू आहे, ते पाहून मी खूश आहे. कलाकारांना आज विविध विषयांवर काम करण्याची संधी मिळते आहे. मग ते नाटक असो, सिनेमा असो किंवा टीव्ही मालिका – सगळीकडे प्रयोगशीलता आणि प्रामाणिकपणा दिसतो.”
OTT प्लॅटफॉर्मच्या वाढत्या प्रभावाबद्दल बोलताना सविता प्रभुणे म्हणाल्या, “टीव्हीचं अस्तित्व संपेल असं मला वाटत नाही. अजूनही लाखो लोक रोज टीव्ही पाहतात. दुपारपासून रात्रीपर्यंत टीव्ही चॅनेल्सना मिळणारं रेटिंग पाहिलं, तर टीव्हीचं महत्त्व अजूनही तेवढंच आहे. लोकांच्या घरात थेट जाऊन मनोरंजन करणं ही टेलिव्हिजनची खासियत आहे.”
अभिनय क्षेत्रात दीर्घकाळ काम करूनही सविता प्रभुणे यांना कधीच कंटाळा आला नाही. त्या म्हणतात, “मी डेलीसोपमध्ये काम करताना दररोज नवं शिकते. पात्र कसं वळण घेईल हे आधी माहीत नसतं, पण तेच मला प्रेरणा देतं. प्रत्येक पात्र प्रामाणिकपणे साकारणं ही कलाकाराची जबाबदारी आहे, आणि ती मी आनंदानं निभावते.”
प्राजक्ता गायकवाड लवकरच लग्नबंधनात; पाहा खास लग्नपत्रिका आणि शुभ मुहूर्त
सविता प्रभुणे यांच्या या विचारांमधून त्यांच्या कामाबद्दलचं प्रेम आणि टेलिव्हिजन माध्यमाविषयीचा विश्वास स्पष्टपणे दिसून येतो. OTT आणि सिनेमांच्या युगातही टीव्हीचं स्थान अढळ राहील, असा ठाम विश्वास या अनुभवी अभिनेत्रीने व्यक्त केला आहे.









