devmanus gopal ajit jamkar promo twist : देवमाणूस ही अशी मालिका आहे जिथे पुढच्या क्षणी काय घडणार, याचा अंदाज बांधणं प्रेक्षकांसाठी नेहमीच कठीण ठरतं. गेल्या काही दिवसांपासून मालिकेतील खुनांच्या मालिकेमुळे कथानक अधिकच गडद झालं आहे. गोपाळ उर्फ देवीसिंग उर्फ अजित ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही निर्माण करत आहे. बाहेरून साधा, देवभोळा वाटणारा गोपाळ प्रत्यक्षात अत्यंत स्वार्थी आणि निर्दयी असल्याचं मालिकेत सातत्याने उघड होत आहे.
गोपाळ स्वतःची ओळख बदलून जगत आहे. पैशांचा लोभ, सुंदर स्त्रियांकडे असलेलं आकर्षण आणि कोणत्याही नात्यात न अडकण्याची वृत्ती, हे त्याच्या स्वभावाचे ठळक पैलू आहेत. घरगुती अडचणींमध्ये अडकलेल्या, मानसिकदृष्ट्या कमकुवत स्त्रियांना तो प्रेम, सहानुभूती आणि सुरक्षित भविष्याचं स्वप्न दाखवतो. त्याच्या गोड बोलण्याला भुलून अनेक स्त्रिया घरच्यांपासून खोटं बोलतात, पैसे आणि दागिने घेऊन त्याच्यासोबत निघून जातात. मात्र, पुढे त्यांचा शेवट अत्यंत भयावह असतो. गोपाळ त्यांच्या संपत्तीवर डल्ला मारतो आणि निर्दयपणे त्यांचा खून करतो.
या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गोपाळची पत्नी लाली. तीही आता त्याच मार्गावर चालताना दिसते आहे. गोपाळच्या प्रेमात इतकी आंधळी झालेली लाली काहीही करण्यास मागे-पुढे पाहत नाही. नुकत्याच भागांमध्ये तिने इन्स्पेक्टर मार्तंड जामकर यांच्या बहिणीचा, आर्याचा खून केल्याचं दाखवण्यात आलं. आर्या गोपाळच्या प्रेमात पडली होती आणि हेच तिच्यासाठी घातक ठरलं.
इतके खून करूनही गोपाळ कधीच पोलिसांच्या हाती लागणार नाही का, असा प्रश्न प्रेक्षकांना सतावत होता. मात्र आता Devmanus च्या नव्या प्रोमोमुळे चित्र बदलताना दिसत आहे. झी मराठीने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये गोपाळ देवळात असताना इन्स्पेक्टर जामकर तिथे दाखल होतो. तो सर्वांसमोर गोपाळला हाक मारतो आणि संतापाच्या भरात त्याला मारहाण करतो. गावकरी आणि कुटुंबीय त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण जामकर बंदुकीचा धाक दाखवत सगळ्यांना गप्प करतो. “हा देवमाणूस नाही, हा नीच आहे. पुरावा पाहिजे असेल तर कोर्टात या,” असे शब्द तो गावकऱ्यांना सुनावतो.
या प्रोमोला “जामकर करणार अजितचा पर्दाफाश” अशी कॅप्शन देण्यात आली असून सोशल मीडियावर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. काही प्रेक्षकांना हे जामकरचं स्वप्न असावं असं वाटतंय, तर काहींना हा क्षण पाहून खूप मजा आल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
हे पण वाचा..सावळ्याची जणू सावली मालिकेत ऐश्वर्याची कारस्थानं उघड, मेहेंदळे कुटुंबाला मोठा धक्का
आता गोपाळ खरोखरच पकडला जाणार का, लाली पुढे काय डाव खेळणार आणि Devmanus मध्ये अजून कोणते धक्कादायक वळण येणार, हे पाहणं प्रेक्षकांसाठी अत्यंत उत्सुकतेचं ठरणार आहे.
हे पण वाचा.. भाऊ मानलं होतं, पण साथ दिली नाही; बिग बॉस मराठी ६ मध्ये रोशन-तन्वी वाद









