Bhushan Kadu Ashish Pawar ‘कॉमेडी एक्सप्रेस’ या लोकप्रिय कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेली भूषण कडू आणि आशिष पवार ही जोडी प्रेक्षकांच्या मनात आजही ताजी आहे. दोघांनी एकत्र साकारलेल्या विनोदी स्कीट्समुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. परंतु गेल्या काही वर्षांपासून भूषण कडू मनोरंजनाच्या क्षेत्रात फारसा सक्रिय दिसत नाही, आणि त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की, भूषण सध्या नेमकं काय करतो आणि कुठे आहे?
अभिनेता आशिष पवारने अलीकडेच ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत याविषयी भाष्य करत सांगितले की, “भूषण कडूसह ‘कॉमेडी एक्सप्रेस’मधील सर्व कलाकारांशी माझी आजही मैत्री कायम आहे. अनेक वर्षांच्या सहवासामुळे आपापसातील नातं घट्ट झालं आहे. मात्र, प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असल्याने आता नियमित संपर्क राहात नाही.”
पुढे तो म्हणाला, “खरं सांगायचं तर मला सध्या भूषण काय करतो हे माहीत नाही. काही वेळा त्याचा फोन आला होता, आम्ही बोललोही, पण तो त्याच्या कामात गुंतलेला होता. मी त्याला विचारलं, ‘काय चाललंय रे?’ तर तो म्हणाला, ‘सगळं व्यवस्थित चाललंय.’ मला वाटलं, बस, एवढं पुरेसं आहे. रोज बोलणं किंवा भेटणं हे सगळ्यांसाठी शक्य नसतं.”
भूषण कडूच्या वैयक्तिक आयुष्यात मात्र काही कठीण प्रसंग आले. त्याची पत्नी कादंबरी कडूचं मे २०२१ मध्ये कोरोनामुळे निधन झालं. तिचं वय केवळ ३९ वर्ष होतं. या घटनेने भूषणला मोठा धक्का बसला. त्यांना प्राकिर्थ नावाचा लहान मुलगा आहे, आणि पत्नीच्या निधनानंतर तो पूर्णपणे प्रसिद्धीपासून दूर राहू लागला.

काही काळानंतर तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये काही भागांत दिसला, परंतु नंतर पुन्हा पडद्यामागे गेला. एका मुलाखतीत भूषण कडूने स्वतः सांगितलं होतं की, त्याला एकदा पुण्यात तीन दिवसांसाठी किडनॅप करण्यात आलं होतं. मात्र त्याला ओळखणाऱ्या एका व्यक्तीमुळे तो वाचला. सध्या तो कुठे आहे, काय करतो याविषयी ठोस माहिती नसली, तरी चाहत्यांना त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने प्रतीक्षा आहे. मनोरंजन क्षेत्रात भूषण कडूचं योगदान आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत.









